अहिल्यानगर - अहिल्यानगर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व
निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र (Digital Life Certificate) सादर करण्याच्या प्रक्रियेची
माहिती व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी बुधवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी हयातीचा दाखला अर्थात जीवन
प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. ही प्रक्रिया अधिक सुलभ, सोयीस्कर आणि तंत्रज्ञानाधारित व्हावी, यासाठी केंद्र शासनाच्या ‘जीवन प्रमाण’ (Jeevan Pramaan) प्रणालीद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा
उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधेच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना
स्मार्टफोनचा वापर करून चेहरा प्रमाणीकरण (Face Authentication) प्रक्रियेद्वारे डिजिटल जीवन
प्रमाणपत्र सादर करता येते. यासाठी https://jeevanpramaan.gov.in
या अधिकृत
संकेतस्थळावर तसेच Jeevan Pramaan Face
App आणि Aadhaar Face RD या मोबाईल ॲपच्या सहाय्याने ही
प्रक्रिया पूर्ण करता येते.
विशेष कार्यशाळेमध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र म्हणजे काय, ते ऑनलाइन कसे सादर करावे, स्मार्टफोनमध्ये आवश्यक मोबाईल ॲप
कसे डाउनलोड करावेत, आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी
कशी करावी आणि चेहरा प्रमाणीकरणाद्वारे जीवन प्रमाणपत्र कसे तयार करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना
प्रत्यक्ष प्रक्रिया समजून घेण्यास मदत होणार आहे.
डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या
सुविधेमुळे निवृत्तीवेतनधारकांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत होते. तसेच संबंधित
कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता कमी होऊन ही प्रक्रिया अधिक सुलभ
होते.
या कार्यशाळेस अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व
निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक तसेच
पेन्शनर्स संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment