शेतकऱ्याचे घर मध्यरात्री चोरट्यांनी फोडले, तब्बल ५ लाख ३७ हजारांचा ऐवज लंपास


श्रीगोंदा - मध्यरात्रीच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि तब्बल ५ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी गावच्या शिवारातील ढगेवाडी येथे १६ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत सागर अशोक चव्हाण (वय ३०, रा. ढगेवाडी, चांभुर्डी, ता.श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, ढगेवाडी येथील शेतकरी सागर चव्हाण यांचे घर १६ नोव्हेंबर रोजी रात्री बंद होते. याच दरम्यान पहाटे 2 च्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील तब्बल ५ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.

सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सागर चव्हाण यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(७) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. नंदकुमार सोनवलकर आणि उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments