कर्जत : सायकलवरून आनंदाने निघालेल्या दोन
चिमुकल्यांचा प्रवास काळाने अर्ध्यावरच संपवला. कर्जत तालुक्यातील निंबोडी फाटा
येथे भरधाव इर्टिगा कारने सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं दोन बालकांचा
जागीच मृत्यू झाला. चैतन्य छगन उदमले (वय ८) आणि ओंकार बापू उदमले (वय १०) अशी मृत
बालकांची नावे आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडलेल्या या भीषण अपघाताने
निंबोडी आणि शितपूरसह संपूर्ण कर्जत तालुका सुन्न झाला आहे.
चैतन्य
आणि ओंकार हे दोघे १४ नोव्हेंबर रोजी दुपारी सायकलवरून शितपूर फाट्याकडून निंबोडी
फाट्याच्या दिशेने जात होते. याचवेळी श्रीगोंद्याकडून जामखेडच्या दिशेने जाणाऱ्या
भरधाव इर्टिगा कारने (एमएच ०४ जेबी २२०४) दशरथ बापू फुले यांच्या घरासमोर
त्यांच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, कारच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं,
तर सायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात दोन्ही बालके गंभीर जखमी
झाली. घटनेची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचा प्रयत्न
केला, पण दोघांचाही जीव वाचू शकला नाही.
दोन्ही
बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात
पाठविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार
क्षीरसागर आणि मिरजगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी घटनास्थळी भेट
दिली. भाजप नेते अशोक खेडकर यांनीही घटनास्थळी धाव घेत संतप्त ग्रामस्थांशी संवाद
साधला.
या
प्रकरणी चैतन्यचे वडील छगन मारुती उदमले यांच्या फिर्यादीवरून कार चालक संदीप दामोदर
उदमले (रा. ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड करीत आहेत.
खेळण्या-बागडण्याच्या वयात दोन बालकांचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं उदमले
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन चिमुकल्यांच्या मृत्यूची बातमी समजताच
निंबोडी आणि शितपूर परिसरात शोककळा पसरली असून, प्रत्येकाच्या
मनात या अपघाताबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment