पुणे - महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. एका प्रवचनादरम्यान त्यांनी प्रेम आणि नात्यांवर भाष्य करत म्हटले की, मुली कधीच मुलांवर प्रेम करत नाहीत, तर त्या केवळ पैशांवर प्रेम करतात. त्यांच्या मते, तरुण मुले अनेकदा मुली आपल्यावर प्रेम करतात असा गैरसमज करून घेतात, मात्र हे सत्य नसून मुलींचे प्रेम पैशांशी जोडलेले असते. हे स्पष्ट करताना ते म्हणाले, प्रेम वगैरे सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत.
यावेळी त्यांनी प्रेमाची स्वतःची अशी एक व्याख्याही सांगितली. त्यांनी आपले मत मांडताना स्पष्ट केले, "लव्ह इज मनी अँड मनी इज लव्ह. मनी इज लाइफ अँड लाइफ इज मनी." इंदुरीकर महाराजांच्या या थेट विधानामुळे आता पुन्हा एकदा समाजात आणि सार्वजनिक पातळीवर त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नेमके काय म्हणाले इंदूरीकर महाराज?
प्रवचन सुरू असताना इंदूरीकर महाराजांनी म्हटले की, असे म्हणतात की ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तिच्या मेंदूच्या तीन शिरा चोकअप आहेत. तेवढ्या काढून ये. पोरगी कधीच मुलावर प्रेम करत नाही. पोरगी पैशावर प्रेम करते. मुलगी कधीच प्रेम करत नाही. खरे आहे की खोटे आहे? तुम्हाला तिघांना आलेला अनुभव आहे. असे म्हणत एका तरुणाकडे ते बोट करून म्हणतात, याला तर मागच्याच महिन्यात मुलीने धोका दिला आहे. खोटं बोलणार नाही.
तसेच पुढे बोलताना इंदूरीकर महाराजांनी स्वतःची एक प्रेमाची व्याख्या सांगितली आहे. ते म्हणतात की, प्रेम वगैरे या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. इंदूरीकरची व्याख्या आहे, 'लव्ह इज अ मनी अँड मनी इज अ लव्ह. मनी इज लाइफ अँड लाइफ इज मनी.' आता त्यांनी केलेल्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Post a Comment