अहिल्यानगर शहराच्या मध्यवस्तीत बिबट्याचा वावर, वनविभागाची ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम


अहिल्यानगर - शहरातील सावेडी उपनगरातील दाट लोकवस्ती असलेल्या तारकपूर, प्रकाशपूर, सिव्हिल हडको परिसर, गंगा उद्यान परिसर, कलेक्टर ऑफिस रोड परिसरात तसेच महापालिका कार्यालयाशेजारील सीक्युएव्ही परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने वन विभाग सतर्क झाला असून वनविभागाचे पथक या परिसरात रात्रंदिवस गस्त घालत तसेच ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेत आहे. सीक्युएव्ही परिसरात ड्रोन कॅमेऱ्यात बिबट्याची हालचाल दिसून आल्याने त्या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांनी दिली.

शहराच्या मध्यवर्ती भागात सावेडी उपनगरात बिबट्याचा वावर आढळून आल्याचा दावा केला जात होता. ड्रोन कॅमेऱ्यात ही हालचाल दिसून आल्यानंतर, १५ नोव्हेंबर रोजी हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. विशेषतः सीक्युएव्ही परिसरात बिबट्याची हालचाल ड्रोन कॅमेऱ्यात हालचाल दिसून आल्यानंतर,वनविभागाने सीक्युएव्ही परिसरात पिंजरे लावल्याची माहिती दिली.

शहरातील सीक्युएव्ही परिसरात मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, गंगा उद्यान व दाट लोकवस्तीचा भाग आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांनी सीक्युएव्ही परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आम्हाला कळवले होते. त्यानुसार त्या ठिकाणी पिंजरे लावले आहेत, असे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी शहरात बिबट्याचा वावर असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा सूचना दिल्या. रात्री घटनास्थळीही पोलिस दाखल झाले होते. १५ नोव्हेंबर रोजी बिबट्या डिटेक्ट झाला आहे. हा दाट लोकवस्तीचा भाग असून शासकीय कार्यालये व गंगा उद्यान आहे. बिबट्या लोकवस्तीत शिरण्याची भिती आहे. काही घडले तर वनविभाग व जिल्हा प्रशासन जबाबदार राहील. त्यामुळे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल इंद्रायणीच्या पाठीमागील शेतात १५ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजता बिबट्या दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सीक्युएव्ही परिसरात परिसरात ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेला बिबट्या आणि हॉटेल इंद्रायणी परिसरात दिसलेला बिबट्या हे दोन्ही बिबटे वेगवेगळे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बिबट्या आपल्या भागात आहे, असे निदर्शनास आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेणे आवश्यक आहे. रात्री अंधारात एकटे बाहेर पडू नये तसेच लहान मुलांना बाहेर एकटे खेळू देऊ नये. बिबट्या जवळपास आढळून आल्यास फटाके वाजवल्यास तो दूर पळून जातो. शेतात रात्री जाण्याची वेळ आली तर हातात मोठी काठी ठेवावी तसेच सोबत किमान दोन व्यक्ती तरी असाव्यात. आपली पाळीव जनावरे शक्यतो बंदिस्त ठेवावीत. घराच्या बाहेर अंधार नसावा. बाहेरील लाईट चालू ठेवाव्यात. बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, नागरिकांनी सोशल मिडीयावर अफवा पसरवू नयेत तसेच घाबरून जाऊ नये, मात्र खबरदारी जरूर घ्यावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांनी केले आहे.  

 


0/Post a Comment/Comments