आधी लग्न कोंढाण्याचे म्हणत, सुट्टीवर आलेले महाराष्ट्रातले ३ जवान बॉर्डर कडे रवाना, वाचा त्यांच्या कथा...



मुंबई - भारत-पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना आहे त्या स्थितीत आपले घरदार सोडून कर्तव्यावर हजर व्हावे लागत आहे. वाशिम येथील एका जवानावर तर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूला सोडून देशासाठी सीमेवर जाण्याची वेळ आली. तर अन्य एका जवानाला भावाचे लग्न सोडून, तर दुसऱ्या एका बाप माणसाला मुलाचा पहिला वाढदिवस सोडून तत्काळ सीमेच्या दिशेने धाव घ्यावी लागली.

वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथील कृष्णा राजू अंभोरे यांनी राष्ट्रभक्तीचे अनोखे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. कृष्णा अंभोरे 18 एप्रिल ते 15 मेपर्यंत लग्नासाठी सुट्टीवर आले होते. त्यांचे 3 दिवसांपूर्वी लग्न झाले. त्यानंतर लगेचच त्यांना सैन्यदलाकडून तत्काळ कर्तव्यस्थळी हजर राहण्याचा आदेश आला. त्यामुळे त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत तत्काळ सीमेच्या दिशेने कूच केली. त्यांच्या पाठवणीसाठी अख्खे गाव वाशिम रेल्वे स्थानकावर जमले होते. यावेळी त्यांच्या नवविवाहित पत्नीच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत होत्या.
पतीच्या सहवासाचा आनंद पुरेपूर उपभोगण्यापूर्वीच विरहाचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. पण या नवविवाहित दाम्पत्याने आपल्या भावनांना बाजूला ठेवून देशसेवेला प्राधान्य दिले. एकमेकांचा हसतमुखाने निरोप घेतला.

लातूरमध्ये लेकाचा वाढदिवस सोडून बाप सीमेवर

दुसरीकडे, लातूरच्या औसा तालुक्यातील जावळी गावचे कैलास सूर्यवंशी हे आपले लग्न व मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठी 45 दिवसांच्या सुट्टीवर आले होते. पण सीमेवर तणाव वाढला आणि त्यामुळे त्यांना तातडीने कर्तव्यस्थळी हजर राहण्याचे आदेश मिळाले. त्यानुसार, ते आज शनिवारी तातडीने मातृभूमीच्या संरक्षणासाठी लातूरवरून निघाले. राजस्थानच्या बिकानेर येथील सीमेवर ते कर्तव्यावर आहेत. ही सीमा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील मानली जाते. त्यांना निरोप देताना त्यांच्या वडिलांचे डोळे पाणावले होते. कैलास हे 2014 मध्ये भारतीय लष्करात भरती झाले होते.

आधी लग्न कोंढाण्याचे, नंतर...

तिकडे नंदूरबारच्या माळीवाडीतील किशोर माळी यांच्यावरही आपल्या भावाचे लग्न सोडून कर्तव्यावर हजर व्हावे लागले. किशोर माळी यांचे बंधू 14 मे रोजी लग्न होते. घरात लग्नाची धामधूम सुरू होती. पण तत्पूर्वीच किशोर यांना सैन्यदलाकडून परत बोलावण्यात आले. त्यानंतर 'कर्तव्य हाच धर्म' माणून आपल्या कर्तव्यस्थळी जाणे पसंत केले. यावेळी गावातील नागरिकांनी डीजेवर देशभक्तीचे गीत लावून त्यांना सन्मानाने परत पाठवले. या भावनिक प्रसंगाने गावकऱ्यांनाही जवानांच्या त्याग आणि समर्पणाची जाणीव झाली. स्थानिकांनी त्यांना शुभेच्छा देत मातृभूमीच्या रक्षणासाठी शक्ती दिली.

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी कर्तव्यावर रवाना

उल्लेखनीय बाब म्हणजे जळगावच्या पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील लष्करी जवान मनोज पाटील यांच्यावरही अशीच वेळ आली होती. त्यांचे गत 5 मे रोजी लग्न झाले. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांना कर्तव्यावर हजर व्हावे लागले. यावेळी नववधूने ऑपरेशन सिंदूरसाठी आपले कुंकू पाठवत असल्याची भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

0/Post a Comment/Comments