पोलिसांनी ‘असा’ उधळला आरोपींचा खुन करून अपघात दाखविण्याचा ‘प्लॅन’, चौघांना ठोकल्या बेड्या

नगर तालुका (प्रतिनिधी) - प्रेमप्रकरणातून तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याची धक्कादायक घटना नगर तालुका पोलीस स्टेशनचे स.पो.नि.प्रल्हाद गीते यांनी तपासातून उघडकीस आणली आहे. या प्रकरणात विश्वजीत सुभाष पोटे व संकेत बाळासाहेब बंडाले (दोघे रा.दादेगाव, ता. आष्टी) यांना ४ जून रोजी पकडल्यानंतर ५ जून रोजी अमरसिंह सुभाष पोटे व धनंजय सुभाष फुंदे (दोघे रा. दादेगाव) या दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असून त्यांचा कसून शोध पोलिस घेत आहेत.

ही घटना ३० मे रोजी सायंकाळी टाकळी काझी (ता.नगर) शिवारातील हॉटेल रायबा समोर घडली होती. आदेश नंदू घोरपडे (वय २२, रा. कायनेटिक चौक, अहिल्यानगर) हा तरूण आणि त्याचा मित्र मोहित संतोष निमसे (वय २०, रा. रंगोली चौक, केडगाव) दुचाकीवरून नगरच्या दिशेने येत असताना आरोपी त्यांचा बुलेट वरून पाठलाग करीत होते. तेव्हा त्यांनी  व इतर आरोपीनी अमर सुभाष पोटे यास फोन करून तू नगरच्या दिशेने कुठपर्यंत आला. मयत हा कुठपर्यंत आलाय आम्ही त्याच्या मागे आहोत, बाबत माहिती देऊन पिकअप वरील अमर पोटे यास मयतास उडविण्यास सांगितल्याने त्याने टाकळी काजी गावच्या शिवारातील हॉटेल रायबाचे समोर मयतास व त्याचे मित्रास उडविले. त्यामुळे घोरपडे याचा मृत्यू झाला होता. व मोहित निमसे जखमी झाला.

मोहित निमसे याने या प्रकरणी २ जून रोजी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात पिकअप चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मृत घोरपडेच्या आईने हा अपघात नसून तिच्या मुलाचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी तपासाची दिशा बदलून अधिक सखोल चौकशी केली असता, ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले.  

यासंदर्भात स.पो.नि. गिते यांनी सांगितले की, आदेश घोरपडे याचे बीड जिल्ह्यातील दादेगाव (ता. आष्टी) येथील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले होते. याची माहिती घोरपडे याला मिळाल्यानंतर त्याने मोहित निमसे व इतर चार मित्रांसह ३० मे रोजी दादेगाव गाठले. तेथे मुलीच्या नातेवाईकांशी त्याचा वाद झाला. या वादानंतर घोरपडे व निमसे दुचाकीवरून पळून आले, तर त्यांचे इतर मित्र चारचाकीने परतले.  

यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी पाठलाग सुरू केला. दरम्यान, घोरपडे व निमसे हे टाकळी काझी शिवारातून जात असताना पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत घोरपडे जागीच ठार झाला. हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सदरची कारवाई स.पो. नि. प्रल्हाद गीते, पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे, पोलिस अंमलदार सुभाष थोरात, रवी सोनटक्के, बाबासाहेब खेडकर, संभाजी बोराडे, सागर मिसाळ, विक्रांत भालसिंग, राजू खेडकर तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे  नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

0/Post a Comment/Comments