सिस्पे कंपनीच्या घोटाळ्याबाबत डॉ.सुजय विखे पाटील यांनी केला खळबळजनक दावा



अहिल्यानगर - पारनेर तालुक्यातील सुपा येथील सिस्पे या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीचे उद्घाटन लोकप्रतिनिधीच्या हस्ते संपन्न झाले होते, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना गाड्यांचे वाटप देखील करण्यात आले होते. परिणामतः, या कंपनीने गोरगरिब शेतकऱ्यांकडून हजारो कोटी रुपये उकळवले आणि फरार झाली. हा प्रकार म्हणजे दिवसाढवळ्या टाकलेला दरोडाच असून, याची संपूर्ण जबाबदारी उद्घाटन करणाऱ्या लोकप्रतिनिधीने घ्यावी. असा टोला माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नाव न घेता लगावला आहे. 

सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात आयोजित भव्य कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी व ग्रामस्थ यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, “आपला लोकप्रतिनिधी जर अशा फसव्या कंपन्यांचे उद्घाटन करत असेल, तर जनतेला त्यावर विश्वास बसणारच. जनता कर्ज काढून पैसे गुंतवणार हे अपेक्षितच आहे. त्यामुळे अशा प्रकारात उद्घाटन करणाऱ्या त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी ठरतेच.” यासोबतच जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प आणि विकासकामांचा अभाव या मुद्द्यांवर देखील त्यांनी सवाल उपस्थित केले. “मी खासदार असताना वेळेआधी प्रकल्प पूर्ण केले, मात्र गेल्या दीड वर्षांत जिल्ह्यात एकही महत्त्वाचा केंद्र सरकारचा प्रकल्प आला नाही,” असे ते म्हणाले.

तसेच, तब्बल ११०० कोटी रुपयांचा साकळाई प्रकल्प पुढील एका महिन्यात भूमिपूजन होणार आहे असल्याची माहिती त्यांनी दिली. सौरवरून घेतलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष पुढाकारातून साकार होत असून, आमदार शिवाजीराव कर्डिले आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने पूर्णत्वास जात आहे. या योजनेमुळे नगरच्या ग्रामीण भागातील जिरायती शेतकऱ्यांना पाणीपुरवठ्याचा मोठा लाभ होणार आहे.

दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात देखील त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, या बाबतीत सध्या काही जण श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ही काही श्रेयवादाची लढाई नाही. काम खरोखर मार्गी कुणी लावले आहे, हे आधी पाहणे गरजेचे आहे. ज्यांना श्रेय घ्यायचे आहे त्यांनी घ्यावे, पण ते घेताना आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे आभार मानावे, त्यांचे आभार प्रदर्शन करणारे फोटो लावावेत. त्यानंतर त्यांनी कितीही बॅनरबाजी केली, तरी आम्हाला काही हरकत नाही. कारण या कामाचे खरे आणि एकमेव श्रेय जर कुणाला जाते, तर ते फक्त नरेंद्रजी मोदी यांनाच जाते. असे ही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments