नगर तालुक्यातील दुर्गम भागातील गावात १७ वर्षानंतर सुरु झाली एसटी बससेवा



नगर तालुका (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील डोंगरी, दुर्गम भागात असलेल्या खांडके या गावात गेल्या १७ वर्षांपूर्वी बंद झालेली एसटी महामंडळाची बससेवा ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा एकदा सुरु झाली आहे. गावात आलेल्या बसचे ग्रामस्थांनी फुलांच्या वर्षावात स्वागत करत बस चालक व वाहकाचा सत्कार केला. 

याबाबत माहिती देताना सरपंच किरण चेमटे म्हणाले की, गावात येणारी एसटी बस १६-१७ वर्षांपूर्वी बंद झाली होती. सदर खांडके गाव हे डोंगरी दुर्गम भागात असल्याने बस अभावी गावातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. तसेच गावातील शालेय विद्यार्थ्यांना उन वारा, पाऊस सहन करत मेहेकरी येथे सायकलवर अथवा पायी जावे लागत होते. ग्रामस्थांची आणि शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय पाहून आम्ही सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, सेवा सोसायटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आ. विक्रम पाचपुते, आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्फत एसटी महामंडळा कडे बस सुरु करण्यासाठी गेल्या ३-४ महिन्यांपासून पाठपुरावा करत होतो.

अखेर एसटी महामंडळाने ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेवून नगर - खांडके ही बससेवा सुरु केली आहे. आ.कर्डिले व आ.पाचपुते यांची या साठी मोलाची मदत झाली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिक्षणासाठी सुरु असलेली त्यांची पायपीट आता थांबणार आहे. मेहेकरी येथील सद्गुरू माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य टेकाळे, उपप्राचार्य चौधरी सर आणि शिक्षकांनी देखील यासाठी पत्रव्यवहार केला होता, असेही चेमटे म्हणाले.
गावात तब्बल १७ वर्षांनंतर एस टी बस आल्याने ग्रामस्थांनी व शालेय विद्यार्थ्यांनी या बस चे फुलांच्या वर्षावात स्वागत करत बस चालक व वाहकाचा सत्कार केला.

0/Post a Comment/Comments