पद्मश्री डॉ.विखे पाटील यांच्या जयंती निमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; महिलांना मिळाल्या पापड मशीन



अहिल्यानगर (प्रतिनिधी) – सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी व ग्रामस्थ यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने या जयंतीला ‘शेतकरी दिन’ म्हणून घोषित केल्याबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले. “आज अनेक वर्षांनंतर पद्मश्रींच्या जयंतीला शोभेल असा कार्यक्रम नगर शहरात घेण्यात आला. सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पायावर उभा रहावा, हेच पद्मश्रींचं स्वप्न होतं. आज आलेला प्रत्येक ज्येष्ठ नागरिक त्या स्वप्नपूर्तीचा साक्षीदार आहे,” असे डॉ. सुजय विखे म्हणाले.

सामाजिक बांधिलकी जपत, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व महिला बचत गटांना मोफत सहाय्यक साधने वाटप शिबिर आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम बंधन लॉन्स, अहिल्यानगर येथे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या उपक्रमात ३०० ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साहित्य वाटप तसेच महिला बचत गटांना फूड प्रोसेसिंग युनिट व पापड मशीन वाटप, प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.सुजय विखे यांनी उपस्थित लाभार्थी व नागरिकांशी थेट संवाद साधला.

डॉ. विखे यांनी पुढे सांगितले की, केंद्र व राज्य सरकारच्या महायुती सरकारमधील योजना गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे करणारा प्रत्येक युवक भविष्यात मोठ्या पदावर पोहोचणारच आहे. “या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १२ हजार रुपयांचे साहित्य कोणतीही कोणाला टक्केवारी न देता मिळत आहे. फक्त मोदीजी, मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटील परिवारावर विश्वास ठेवल्याने आज ही मदत शक्य झाली,” असे ते म्हणाले.

भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की, डॉ. सुजय विखे पाटील हे असे लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांनी पराभव विसरून नेहमीच ज्येष्ठ नागरिकांची सेवा आणि विकासकामांमध्ये पूर्ण योगदान दिले आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांनी कुठलाही विचार न करता दुसऱ्याच दिवशी कामाला सुरुवात केली आणि माजी खासदार असल्याची भावना कधीही आम्हाला जाणवू दिली नाही. विकासकामे आणि समाजसेवा यांच्या माध्यमातून सतत लोकांमध्ये राहून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आगामी काळात विखे परिवार, विखे फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी नेहमी आपल्या सोबत खंबीरपणे उभी राहील असे मत मांडून पुन्हा एकदा स्वर्गीय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याला आणि प्रेरणेला वंदन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अकोळनेरचे सरपंच प्रतीक शेळके यांचे विशेष कौतुक करताना, “वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ३०० ज्येष्ठ नागरिक व महिलांची नोंदणी करून त्यांना या कार्यक्रमासाठी एकत्र आणणं ही मोठी कामगिरी आहे. खरा नेता तोच, ज्याच्या पाठीशी अशा कार्यकर्त्यांचा मजबूत पाठिंबा असतो,” असे डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments