अहिल्यानगर
(प्रतिनिधी) – जिल्हा
पोलीस दलात नव्या ‘डॉबरमॅन’ श्वानाची भरती करण्यात आली असून, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते या श्वानाचे नामकरण ‘ब्रावो’
असे करण्यात आले. ब्रावो हे 45 दिवसांचे नर पिल्लू असून,
पुण्यातून विशेषतः गुन्हे शोध कार्यासाठी आणण्यात आले आहे.
गुन्हे
शोध, स्फोटके व अंमली
पदार्थांचा मागोवा घेण्यासाठी पोलीस दलामध्ये श्वान पथकाचे योगदान महत्त्वाचे
मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने अनेक
गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अशा या श्वानांची सेवा ही निश्चित
कालावधीसाठी मर्यादित असते. पोलीस दलात श्वानाचे निवृत्तीचे वय 10 वर्ष असल्याने त्यानंतर
नवीन श्वानाची भरती केली जाते.
ब्रावो
या नव्या सदस्याची संगोपन व निगा याकरिता नियोजन करण्यात आले असून, पुढील चार महिने ब्रावो
याचे संगोपन स्थानिक पातळीवर केले जाणार आहे. त्यानंतर 9 महिने त्याला पुणे येथील
प्रशिक्षण केंद्रात विशेष प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण
झाल्यानंतर ब्रावो जिल्हा पोलीस दलात औपचारिकरित्या गुन्हे शोध पथकात समाविष्ट
होणार आहे.
यासंदर्भात
पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले की, ब्रावो हा पोलीस दलाचा नवीन साथीदार असून, त्याच्यामार्फत आगामी
काळात गुन्ह्यांच्या तपासात अधिक प्रभावी मदत मिळेल, असा विश्वास आहे. ब्रावो याची जबाबदारी सध्या पोलीस अंमलदार
उमेश गोसावी यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, ब्रावो खूपच उत्साही आणि
चलाख आहे. त्याचे संगोपन करताना विशेष काळजी घेतली जात आहे.
Post a Comment