नगर तालुका (प्रतिनिधी) - शासकीय योजनेतून सौर कृषी पंप मिळवून देण्याच्या नावाखाली राहुरी येथील एका सोलर कंपनीच्या सबडिलरने अनधिकृतपणे शेतकऱ्यांकडून प्रत्येक सुमारे १० हजार रुपयांपर्यंतच्या आगाऊ रकमा स्वीकारल्या. पैसे घेऊन १० महिन्यांचा कालावधी उलटला तरी देखील पंप बसवून न देता शेतकऱ्यांची सुमारे २ लाख ६७ हजार २०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना नगर तालुक्यातील खातगाव टाकळी येथे २४ जानेवारी २०२५ ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली.
शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी व वीज खर्चात बचत व्हावी यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी ९० ते ९५ टिक्के अनुदानावर सौर कृषी पंप योजना राबविली जात आहे. सौर पंप मिळण्यासाठी अर्ज ऑनलाईन केव्हा व कसा करायचा याबाबत माहिती होत नसल्याने अनेक शेतकरी गरज असुनही लाभापासून वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा उठवत राजेंद्र माधव बोऱ्हाडे (रा. आळेफाटा, ता.जुन्नर, जि.पुणे) याने खातगाव टाकळी येथील शेतकऱ्यांना आपण सोलर कंपनीचे सबडिलर असल्याचे सांगत सौर पंप मिळवून देण्याचे अमिष दाखवत जानेवारी २०२५ मध्ये गावांतील शेतकऱ्यांकडुन रोख रकमा उकळल्या मात्र त्यांना सौरपंप मिळाले नाही. त्याला फोन केला असता पुढील आठवड्यात सौर पंप बसवून देतो असे सांगत चालढकल केली. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी त्याच्या बाबत अधिक माहिती घेतली असता त्याने राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचीही अशीच फसवणूक केली असल्याचे त्यांना समजले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी आरोपी राजेंद्र बोऱ्हाडे विरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ४ नोव्हेंबर रोजी माजी सैनिक विजय भानुदास जपे (वय ५२, रा. खातगाव टाकळी, ता.नगर) यांनी शेतकऱ्यांच्या वतीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी राजेंद्र बोऱ्हाडे याच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१८ (४), ३१६ (२)(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment