श्रीगोंदा - श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे सोमवारी (ता. २९) पहाटे अज्ञातांनी ३ ते ४ चोरट्यांनी श्री कोळाई देवी मंदिराचे कुलूप तोडून चोरी केली. मात्र, चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसून त्यांनी १२०० रुपयांची चिल्लर लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी मंदिराचे पुजारी हर्षद गुरव यांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दानपेटी फोडून तसेच मंदिरातील कपाटाची उचकापाचक करत मुद्देमाल पळवण्याचा त्यांचा डाव होता. मात्र १२०० रुपयांची चिल्लर त्यांच्या हाती लागली. कोळगावचे आराध्य दैवत असलेल्या कोळाईदेवी मंदिरात गेल्या दोन वर्षांत चोरी होण्याची ही तिसरी वेळ आहे. वारंवार मंदिर फोडण्याचे प्रकार घडत असल्याने स्थानिक रहिवासी आणि भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. चोरट्यांचा कोणताही सुगावा लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गुलशन पवार आणि पोलिस कर्मचारी दादासाहेब क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. परिसरातील संशयास्पद हालचालींची माहिती घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Post a Comment