अहिल्यानगर - अहिल्यानगर शहराचे माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर एका २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गुन्हा शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.१५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
शिरूर (जि.पुणे येथील तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे. पिडित युवती तीन महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात असताना तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिषेक कळमकर यांच्याशी संपर्क साधला होता. नोकरीची गरज असल्याचे सांगितल्यानंतर कळमकर यांनी तिला कागदपत्रांसह भेटीसाठी अहिल्यानगरला बोलावले. एमआयडीसी परिसरातील स्वतःच्या शाळेत कामाला लावून देतो असे सांगून त्यांनी पीडितेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शाळा दाखवण्याच्या बहाण्याने तिला विळद घाट परिसरात नेले आणि तिथे शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर गाडीतच अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.
या घटनेनंतर कळमकर यांनी पीडितेला व्हिडिओ कॉल करून आणि धमकावून तिचा छळ सुरूच ठेवला. १८ फेब्रुवारी रोजी शिरूर येथील एका हॉटेलमध्ये कागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने बोलावून तिथेही तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले व त्याचे चित्रीकरण केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या कृत्याबाबत कोणाला सांगितल्यास पीडितेसह तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पीडित तरुणीने या संदर्भातील काही व्हिडिओ स्वरूपातील पुरावे पोलिसांकडे सादर केल्याची माहिती मिळत आहे. या आधारे पोलिसांनी कळमकर यांच्या विरुद्ध बीएनएस कलम ६४ (१), ६४ (२) (एम), ६९, ३५१ (२) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या कडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, शहराचे माजी महापौर आणि राजकीय पदाधिकारी असलेल्या व्यक्तीवर गंभीर आरोप झाल्यामुळे अहिल्यानगरमध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा ...
‘धुरंधर २’ मध्ये दिसणार 'हा' सर्वांत मोठा बदल; १९ मार्चला होणार प्रदर्शित

Post a Comment