१ हजाराची लाच घेताना सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला ‘एसीबी ने’ रंगेहाथ पकडले


अहिल्यानगर - तहसील कार्यालयात ओळख असल्याचे सांगून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात १ हजार रुपयांची लाच घेताना राहुरी नगरपरिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या कंत्राटी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बाबासाहेब किशोर राऊत (वय ४०, रा. बुरुडगाव रोड, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदाराचे शासकीय ‘राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य’ योजनेअंतर्गत ३० हजार रुपये मंजूर करून देण्यासाठी राऊत याने १ हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, तक्रारदाराने याबाबत अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार २० मार्च रोजी दुपारी ४ ते ४.३० च्या दरम्यान लाच मागणी पडताळणी करण्यात आली. यात बाबासाहेब राऊत याने लाच स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर सापळा रचून राऊत याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या विरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे, पो.कॉ. गजानन गायकवाड, वैभव सुपेकर, सचिन सुद्रुक यांच्या पथकाने केली. दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी केले आहे.


 

 

0/Post a Comment/Comments