भोंदूबाबा प्रकरणातील पिडीत महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल


अहिल्यानगर - नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातील पिडीत महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात अशोक खरात याच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल असून, या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, या गंभीर गुन्ह्यातील पिडीत महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याचे समोर आले होते.

याप्रकरणी २५ मार्च २०२६ रोजी कोपरगाव येथील ‘बीएमडब्ल्यूया व्हॉट्सअॅप ग्रुपवर राहुल गंगाधर शिंदे (अनिल कोल्ड्रींग्ज, कोपरगाव) याने त्याच्या मोबाईलवरून अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचे निष्पन्न झाले. पोलिस तपासात हे व्हिडिओ त्याला योगेश पंढरीनाथ आढाव (रा. कोपरगाव) याने पाठविले होते. पुढील तपासात आढाव याला हे व्हिडिओ त्याचा मित्र संदीप गर्जे (रा. माजलगाव, जि. बीड) याने पाठविल्याचे उघड झाले.

त्यावरून राहुल शिंदे, योगेश आढाव व संदिप गर्जे या तिघांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम २९४ (२), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील राहुल शिंदे व योगेश आढाव यांना अटक करण्यात आली असून, संदिप गर्जे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

सदर प्रकरण अत्यंत संवेदनशील व गंभीर स्वरूपाचे असून अनेक महिला पिडीत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे तपास अत्यंत गोपनीयतेने व पिडीतांची ओळख उघड होणार नाही, याची दक्षता घेत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पिडीत महिलेची किंवा तिच्या कुटुंबाची ओळख उघड होईल असे कोणतेही व्हिडिओ, फोटो अथवा अश्लील सामग्री सोशल मीडियावर प्रसारित करू नये. अशा प्रकारची सामग्री आढळल्यास ती तात्काळ हटवावी. अन्यथा संबंधितांवर तसेच ग्रुप अॅडमिनवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


 

0/Post a Comment/Comments