नातींना वाचवण्यासाठी आजीची जीव धोक्यात घालून आगीच्या ज्वाळांत उडी, पुढे घडलं असं...



राहुरी : राहुरी शहरातील मल्हारवाडी रस्त्यावरील करपे इस्टेटमध्ये मंगळवारी (दि.१७)दुपारी एका घरात अचानक आग लागली. यावेळी घरात दोन छोट्या मुली होत्या. बाहेरून आलेल्या मुलींच्या आजीने जीव धोक्यात घालून घरात शिरून दोन्ही नातींना सुखरूप बाहेर काढले. त्यात, भाजल्यामुळे आजी जखमी झाल्या. आसपासच्या नागरिकांनी मदत कार्य करून आग आटोक्यात आणली.

नितीन कोरडे (रा. मल्हारवाडी रोड, राहुरी बुद्रुक) यांच्या घरात मंगळवारी दुपारी दोन वाजता अचानक आग लागली. यावेळी घरात दोन छोट्या मुली आगीच्या विळख्यात अडकल्या. त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. त्याचवेळी बाहेर गेलेल्या मुलींच्या आजी मनीषा कोरडे घरी परतल्या. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून घरात प्रवेश केला. घरात आगीचा भडका उडाला असताना दोन्ही मुलींना सुखरूप घराबाहेर काढले.

या घटनेत भाजल्यामुळे कोरडे जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. घटना समजताच माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, परिसरातील नागरिक दिलीप गोसावी, अक्षय गोपाळे, बाळासाहेब वराळे, गणेश आघाव, अक्षय कडू, अश्विन फुलसौंदर, लखन चव्हाण, मिलिंद हरिश्चंद्रे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. पाणी मारून घरातील आग नियंत्रणात आणली.

घरातील गृहोपयोगी सामान जळून खाक झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. परंतु घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. आगीचे कारण समजले नाही. प्रशासनाने पंचनामा करून कोरडे कुटुंबाला शासनातर्फे आर्थिक मदत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 


0/Post a Comment/Comments