अहिल्यानगर - उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील नामांकित मेडिकल कॉलेज मध्ये मुलाचे मॅऩेजमेंट कोट्यातून 'एमबीबीएस' ला अॅडमिशन घेवून देतो असे सांगत दोघांनी एका सेवानिवृत्त शिक्षकाकडून तब्बल ४० लाख रुपये घेवून त्याला बनावट पावती व अलॉटमेंट लेटर देवून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर शहरातील दोघांच्या विरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात १७ मार्च रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रमजान नबू शेख (वय ६१, रा. स्वामी समर्थ नगर, शिक्षक कॉलनी, कर्जत) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी मोसिन महेबूब शेख व नाहीला मोसिन शेख (दोघे रा. संजीरी मेडिकल समोर, शहा कॉलनी, गोविंदपुरा, अहिल्यानगर) यांच्याशी ओळख होती. गतवर्षी जुलै महिन्यात फिर्यादी शेख हे त्यांच्या मुलाचे 'एमबीबीएस' ला अॅडमिशन घेण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना आपली उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील नामांकित मेडिकल कॉलेज शारदा युनिवर्सिटी येथील मॅऩेजमेंट शी चांगली ओळख आहे. तुमच्या मुलाला मॅऩेजमेंट कोट्यातून 'एमबीबीएस' ला अॅडमिशन घेवून देतो असे सांगत त्यासाठी ७० लाख रुपये फी द्यावी लागेल असे सांगितले.
त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी ३१ जुलै २०२५ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत फोन पे, गुगल पे, एन ई एफ टी, आर टी जी एस द्वारे २६ लाख ९३ हजार ८६० रुपये ऑनलाईन आणि १३ लाख ६ हजार १४० रुपये रोख स्वरुपात असे ४० लाख रुपये आरोपींना दिले. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींना वेळोवेळी मुलाच्या अॅडमिशन बाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. काही दिवसांनी त्यांना शारदा युनिवर्सिटीच्या नावाची पावती व अलॉटमेंट लेटर दिले. फिर्यादी यांनी याबाबत खात्री केली असता ते बनावट असल्याचे समोर आले.
या आरोपींनी मुलाचे मॅऩेजमेंट कोट्यातून 'एमबीबीएस' ला अॅडमिशन घेवून देण्याच्या नावाखाली ४० लाख रुपये घेवून आपली फसवणूक केल्याचे रमजान शेख यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी कर्जत पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी दोघा आरोपींच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३), ३४० (२), ३३८, ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बोऱ्हाडे हे करत आहेत.

Post a Comment