नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील अकोळनेर शिवारात चास रोडवर असलेल्या कोळगेवाडी जवळील भोर वस्तीवर अज्ञात ५ दरोडेखोरांनी शेजारी शेजारी राहणाऱ्या बहिण भावाच्या घरावर दरोडा टाकत सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लुटून नेल्याची घटना १९ मार्च च्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात ५ अज्ञात दरोडेखोरांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नवनाथ शिवाजी भोर (वय ४५, रा भोरवस्ती, अकोळनेर, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे १९ मार्च च्या मध्यरात्री घरात झोपलेले असताना त्यांना कुत्रे जोरजोरात भुंकल्याचा आवाज आल्याने ते जागे झाले. त्यांनी घराचा दरवाजा उघडून बाहेर आले असता २ दरोडे खोरांनी त्यांना पकडले. त्यांनी व त्यांच्या इतर साथीदारांनी भोर यांना आरडाओरडा केला तर जीवे मारू अशी धमकी देत घरात नेले. नंतर जीव वाचवायचा असेल तर घरातील सर्व दागदागिने व पैसे मुकाट्याने काढून द्या असे धमकावले.
त्यामुळे त्यांनी घरातील मौल्यवान ऐवज काढून दिला. त्यानंतर दरोडेखोरांनी भोर यांच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्या बहिण मिनाक्षी उंडे यांच्या घराकडे मोर्चा वळविला. त्यांनी त्यांना धमकावत घराचा दरवाजा उघडायला लावला. त्यानंतर त्यांना ही दम देवून घरातील मौल्यवान ऐवज काढून देण्यास सांगितले. जीवाच्या भीतीने त्यांनी घरातील ५ हजारांची रोकड व दागिने काढून दिले. दरोडेखोरांनी दोन्ही घरातून एकूण दिड ते दोन तोळ्याचे दागिने व रोकड घेवून तेथून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक शिरीष वमने, नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. गणेश वारुळे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, पो.हे.कॉ. मंगेश खरमाळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी नवनाथ भोर यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१० (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment