भविष्य सांगण्याच्या बहाण्याने दोन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक, सोन्याच्या अंगठ्या लंपास


अहिल्यानगर - भविष्य सांगण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत दोन भामट्यांनी दोघा ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करत त्यांच्या हाताच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना एकाच दिवशी २८ मार्च रोजी सकाळी १ तासाच्या अंतराने नगर शहरातील पुणे बसस्थानक व केडगाव वेशीसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर घडल्या आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास शहरातील पुणे बसस्थानक परिसरात घडली. याबाबत अरूण सहादु निंबाळकर (७४, रा. लेखानगर, एकविरा चौक, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी निंबाळकर सकाळी नातेवाईकांकडे जाण्यासाठी पुणे बसस्थानकावर पाथर्डी बसची वाट पाहत उभा होते. यावेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने दुसऱ्याचे भविष्य सांगण्याचे नाटक केले. काही वेळाने ते दोघे निंबाळकर यांच्या जवळ आले. त्यांनी निंबाळकर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या दोघांनी निंबाळकर यांना २० रूपयांच्या नोटेमध्ये सोन्याची अंगठी ठेवण्यास सांगितले. अंगठीवर फुंकर मारून ती पिशवीत ठेवल्याचा बहाणा केला. काही वेळाने तपासले असता पिशवीत अंगठी व नोट दोन्ही मिळून आले नाही.

साधारण ३५ वर्षे वयाचा एक आणि २५ ते ३० वर्षे वयाचा दुसरा संशयित आरोपी अशा दोघांनी मिळून ही फसवणूक केली आहे. चोरीला गेलेली अंगठी ७ ग्रॅम वजनाची असून त्यात पिवळ्या रंगाचा पुष्कराज खडा होता. निंबाळकर यांनी आपल्या मुलाला माहिती दिली. मुलगा घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार सूर्यकांत डाके हे करीत आहेत.

दुसरी घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास केडगाव वेस परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर घडली. याबाबत संतोष चंद्रसेन गायकवाड (वय ६८, रा. समतानगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसले होते. यावेळी दोन अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने 'मी खूप मोठा ज्योतिषी आहे, तुमचे भविष्य पाहतो' असे सांगून गायकवाड यांचा विश्वास संपादन केला. एका दगडाचा रुद्राक्ष करून दाखवत भामट्यांनी त्यांना भुरळ घातली. त्यानंतर 'भविष्य पाहण्यासाठी बोटातील अंगठी २० रुपयांच्या नोटेत गुंडाळून ठेवा' असे त्यांना सांगण्यात आले.

गायकवाड यांनी विश्वासाने ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून दिली. आरोपीने सदर अंगठी नोटेत गुंडाळून त्यांच्या शर्टाच्या खिशात टाकल्याचा बनाव केला. काही वेळाने दोन्ही आरोपी तेथून पसार झाले. संशय आल्याने गायकवाड यांनी खिशाची तपासणी केली असता, त्यात अंगठी आणि २० रुपयांची नोट मिळून आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. फिर्यादीनुसार, एक आरोपी ३५ वर्षांचा असून त्याने पांढरा शर्ट घातला होता, तर दुसरा २५ ते ३० वयोगटातील आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments