पारनेर - पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील प्रसिद्ध श्री कोरठण खंडोबा देवस्थान येथील मंदिरातील दानपेटी मंदिराच्या पुजाऱ्याच्या नातवाने फोडून त्यातील अंदाजे २५ हजारांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवस्थानच्या अध्यक्ष शालिनी अशोक घुले (वय ४५, रा. पिंपळगाव रोठा, ता. पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अनिकेत विकास क्षिरसागर (रा. पिंपळगाव रोठा, ता. पारनेर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पिंपळगाव रोठा येथील प्रसिद्ध श्री कोरठण खंडोबा देवस्थान हे पारनेर तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे, या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. आलेले भाविक मनोभावे मंदिरातील दानपेटीत दान टाकत असतात.१० फेब्रुवारी रोजी सकाळी सदर मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर देवस्थानच्या वतीने या चोरीची चौकशी करण्यात आली. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता त्यात दानपेटी फोडणारा संशयित चोरटा दिसून आला होता.
त्यानंतर १ मार्च रोजी देवस्थान समितीच्या विश्वस्थांची या विषयावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीत याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार देवस्थानच्या अध्यक्ष शालिनी अशोक घुले यांनी २ मार्च रोजी पारनेर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी संशयित आरोपी अनिकेत विकास क्षिरसागर (रा. पिंपळगाव रोठा, ता. पारनेर) याच्या विरुद्ध बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दानपेटी चोरणारा आरोपी हा मंदिराच्या पुजाऱ्याचा नातू असल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
हे ही वाचा...
प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली...'मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते...'
'भयानक हल्ले अद्याप बाकीच..' अमेरिकेचा इराणला निर्वाणीचा इशारा

Post a Comment