प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली...'मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते...'



मुंबई - मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणजे, कित्येक तरुणांच्या गळ्यातील ताईत. मराठी सिनेसृष्टीतली 'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. सोनालीचा 'तिघी' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि सर्वांना तो खूप आवडला. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना सोनाली कुलकर्णीनं तिला इंडस्ट्रीत आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांबाबत सांगितलं आहे. अशातच तिनं तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते, असं अभिमानानं सांगितलं आहे. तसेच, पतीसोबतच्य नात्याबाबतही तिनं अगदी मनमोकळेपणानं सांगितलं आहे.

सोनाली कुलकर्णीनं नुकतीच 'आरपार' युट्यूब चॅनलला मुलाखत दिलेली. मुलाखतीत सोनाली वेगवेगळ्या विषयांवर भरभरुन बोलली आहे. त्याचप्रमाणे तिनं इंडस्ट्रीतल्या विचित्र अनुभवाबाबतही सांगितलं आहे. त्याप्रमाणे तिनं तिचा नवरा आणि त्याच्यासोबतच्या नात्याबाबतही सांगितलंय. आम्ही एकत्र आहोत, पण आमच्या आर्थिक गोष्टी वेगवेगळ्या आणि स्वतंत्र आहेत, असं सोनाली कुलकर्णी म्हणाली आहे.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काय म्हणाली? 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली की, "जेव्हा मी लग्नाचा गांभीर्यानं विचार करायला लागले, तेव्हा मुलगा कसा पाहिजे याबद्दल विचार केला. मला असं वाटलं की, घरी आल्यानंतर आम्ही त्याच त्याच गप्पा मारणार नाही. जो मला जगण्याच्या दुसऱ्या बाजूही दाखवेल. आयुष्य एवढं संकुचित नाही, त्याच्या बऱ्याच बाजू आहेत. म्हणून मी इंडस्ट्रीच्या बाहेरचा मुलगा बघत होते. त्यानंतर मी कुणालला भेटले. त्यानं मला गोष्टींकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला..."

पुढे बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाली की, "आम्ही खूप प्रवास करतो. त्यालाही जगातल्या विविध ठिकाणी फिरायला आवडतं. आम्ही ठरवलं आहे की, प्रत्येक वाढदिवसाला एक नवीन देश बघायचा. मी गृहिणी म्हणून संसार आणि घराकडे बघते. आम्ही एकत्र आहोत, परंतु आमच्या आर्थिक गोष्टी वेगवेगळ्या आणि स्वतंत्र आहेत..."

"बऱ्याचदा लोकांच्या कमेंट्स येतात किंवा सुरुवातीला खूप कमेंट्स यायच्या की बाहेरच्या देशातला आहे, तर खूप पैसा कमवणारा असेल. शेवटी मुली हेच करतात. तर मला अतिशय अभिमानानं सांगायचं आहे की, मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते. त्यामुळे मी त्याचे पैसे बघितलेलेच नाहीत. मला माहीत नाही की, तो किती कमावतो. नेमके पैसे मला माहीत नाहीत; पण आमच्यात ही चर्चा झाली आहे की मी त्याच्यापेक्षा जास्त कमावते. याचं त्यालाही वावगं वाटत नाही, असुरक्षितता वाटत नाही...", असं सोनाली कुलकर्णी म्हणाली. 


 

0/Post a Comment/Comments