नगर तालुका (प्रतिनिधी)- एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला हॉटेल मध्ये डांबून ठेवत तिला बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले तसेच हॉटेल चालकाने तिला नगर शहरातील एका फ्लॅटवर नेवून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथे उघडकीस आला आहे. या मध्ये हॉटेल मालकाला एका महिलेने ही साथ दिल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपींनी तिला चुकीच्या कामासाठी प्रवृत्त केले. फेब्रुवारी २०२४ पासून हा प्रकार सुरु होता. सुरुवातीला आरोपी भैय्या उर्फ गणेश संपत गोरे (रा. रुईछत्तीशी, ता. नगर) याने पीडितेला आपल्या ताब्यातील गाडीत बळजबरीने बसवून नगर शहरातील एका फ्लॅटवर नेले. तिथे तिला डांबून ठेवत तिची लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर पिडीतेला रुईछत्तीशी येथील हॉटेल वर डांबून ठेवत वेश्याव्यवसाय करायला भाग पाडले. या संपूर्ण प्रकरणात अंजली उर्फ राणी परमेश्वर काळे (रा. वाघोली, पुणे) हिने देखील साथ दिल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
पिडीत मुलीने गुरुवारी (दि.२६ मार्च) नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी दोघा आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ९६, ९८, ९९, ६४, १४०(४) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत आहेत.

Post a Comment