नगर तालुका (प्रतिनिधी)- जमिनीच्या जुन्या वादातून एका ७५ वर्षीय वृद्धावर जादूटोणा करून त्यांना मानसिक त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार नगर तालुक्यातील आव्हाडवाडी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाडवाडी येथील रहिवासी आबासाहेब दगडू आंधळे यांचा आरोपी पोपट एकनाथ पालवे याच्यासोबत जमिनीचा वाद सुरू आहे. याच वादातून २६ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आंधळे यांच्या घराच्या गेटसमोर जादूटोण्याचा प्रकार करण्यात आला. आरोपीने स्वतः किंवा इतर व्यक्तीमार्फत फिर्यादीवर जादूटोणा करून त्यांना इजा पोहचवण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वृद्धाने तातडीने पोलिसांत धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि पोलीस हवालदार दिवटे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा प्रकारांविरुद्ध पोलिसांनी कडक पावले उचलली असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Post a Comment