अहिल्यानगर जिल्ह्यात दरोडे टाकणारी ‘बदाम गँग’ गजाआड; 10 गुन्हे आले उघडकीस

 



अहिल्यानगर (प्रतिनिधी) - पाथर्डी तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथे दरोडा टाकणार्‍या ‘बदाम गँग’ला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासांत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांना आश्रय देणार्‍याला गुन्ह्यात आरोपी करून अटक केली आहे. तर, त्यांचे तीन साथीदार पसार झाले आहेत. पकडलेल्या आरोपींकडून 10 लाख 71 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

चिंचपुर पांगुळ येथील दगडू भिमराज बडे (वय 47) यांच्या घरी बुधवारी (18 मार्च) पहाटे एक वाजताच्या सुमारास दरोडेखारांनी घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला. दगडू बडे व त्यांची पत्नी झोपेत असताना दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत जीव मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दगडू यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून तसेच कपाटातील दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख 62 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. बातमीदारांच्या मदतीने हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार बदाम कडू काळे (रा. शिरोडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मजले चिंचोली (ता. शेवगाव) येथील शिवारात सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले.

यामध्ये बदाम काळे (वय 22) याच्यासह साईनाथ विष्णु चव्हाण (वय 22, रा. मुडदे वडगाव, ता. गंगापूर), ऋतिक हसमुख चव्हाण (वय 20), महेश उर्फ उमेश नंदु काळे (वय 20, दोघे रा. खोसपुरी, ता. अहिल्यानगर), भैय्या कडू काळे आणि लाकर करमत काळे (वय 26, दोघे रा. शेकटा, ता. गंगापूर) यांचा समावेश आहे. तसेच या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपी पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. ताराचंद विरूपण भोसले (रा. गाजगाव, ता. गंगापूर), बोट्या उषा भोसले (रा. अंतापुर, ता. गंगापूर) व तिरंगा कडू काळे (रा. शिरोडी, ता. गंगापूर) अशी त्यांची नावे आहेत.

ओळखीच्या व्यक्तीकडे मुक्काम

तपासादरम्यान संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, ते गुन्हा केल्यानंतर स्वतःच्या घरी न राहता ओळखीच्या व्यक्तींकडे लपून राहत असल्याचे समोर आले. चिंचपुर पांगुळ येथे दरोडा टाकल्यानंतर संशयित आरोपींनी त्यांच्या ओळखीच्या मजले चिंचोली येथील संजय भागचंद आव्हाड (वय 50) याच्याकडे आश्रय घेतला होता. दरोडेखोरांना आश्रय दिल्याप्रकरणी संजय आव्हाड यालाही गुन्ह्यात सहभागी करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

नेवासा, शेवगाव, राहुरीत करायचे गुन्हे

पोलिसांनी संशयित आरोपींकडून 69 ग्रॅम सोन्याचे दागिने, विविध कंपन्यांचे 6 मोबाईल तसेच चाकू, लोखंडी शस्त्रे असा एकूण 10 लाख 71 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सखोल तपासात आरोपींनी शेवगाव, नेवासा, सोनई व राहुरी परिसरात केलेले आणखी 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. मुख्य संशयित बदाम काळे व महेश काळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.


 

 

0/Post a Comment/Comments