श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोड परिसरात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या श्रीराम झेंडा मिरवणुकीवर अचानक दगडफेक झाली. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून, याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुयोग सुभाष झिरंगे (वय 34, रा. झिरंगे वस्ती, गोंधवणी रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, रामनवमीच्या निमित्ताने ऋषिकेश सोनवणे यांच्या वतीने महादेव मंदिर, गोंधवणी येथून पारंपरिक श्रीराम झेंडा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ही मिरवणूक दुपारी सुमारे 12.30 वाजता गोंधवणी येथून सुरू होऊन गोंधवणी रोडमार्गे दशमेश चौक, मौलाना आझाद चौक मार्गे पुढे जात सय्यदबाबा चौक येथे सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास पोहोचली.
याठिकाणी मशिदीतील मौलाना व काही अनोळखी 10 ते 12 तरुणांनी अचानक मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मिरवणुकीत गोंधळ उडाला. या दगडफेकीत सुयोग झिरंगे यांच्या डोक्याला दगड लागून सूज आली आहे. तसेच किरण राजेंद्र लबडे यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली असून, यश राजेंद्र गोराणे यांच्या डाव्या डोळ्याखाली गंभीर जखम झाल्याने त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर तसेच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मशिदीतील मौलाना सह 10 ते 12 जणांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 190(1), 191(1), 191(2), 192, 110, 118(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेची माहिती शहरभर वार्यासारखी पसरताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली.

Post a Comment