राहाता - राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील मापरवाडी
भागात राहणारे सोमनाथ जिजाबापू गाडगे या शेतकर्याचा सोमवारी सायंकाळी वीज पडून
दुर्दैवी मृत्यू झाला. सोमनाथ हे 36 वर्षांचे तरुण शेतकरी होते. मापरवाडी
भागात त्यांची दोन ठिकाणी शेती आहे. घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जमिनीत
त्यांनी कांदा लागवड केली. सोमवारी काही महिला मजुरांना कांदा काढणीचे काम दिले
होते. दिवसभर कांद्याची काढणी केल्यानंतर सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात
झाली. महिला मजूर पावसापासून बचावासाठी प्लास्टिक कागदाच्या आश्रयाला असताना
त्यांच्यापासून काही अंतरावर असलेल्या सोमनाथ यांच्यावर वीज कोसळली. मोठा आवाज
झाला आणि आगीचे लोळ सोमनाथ यांच्या अंगावर कोसळले. जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.
अवकाळी
पावसाने प्रवरा परिसरातील शेतकर्यांचा घेतलेला हा पहिला बळी ठरला. सोमनाथ हे तरुण
शेतकरी होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा,
तीन मुली, आई असा परिवार आहे. या घटनेने लोणी
खुर्द परिसरात शोककळा पसरलीआहे. घटना घडल्यानंतर सोमनाथ यांना प्रवरा रुग्णालयात
दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान लोणी व
परिसरातील अनेक गावात सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट,
ढगांचा गडगडाट आणि कुठे अधिक तर कुठे कमी पावसाची हजेरी बघायला
मिळाली. या पावसाने फळबागा, भाजीपाला आणि रब्बी पिकांचे मोठे
नुकसान झाले आहे.शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावुन
नेल्याचे चित्र आहे.
पुढचे
तीन दिवस अधिक अवकाळी पाऊस होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले असल्याने शेतकर्यांपुढे
मोठे संकट उभे राहिले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे
करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. पिक विमा असो नसो सर्व नुकसानीचे शासनाने
पंचनामे करावेत. खरीप पिकांचा पीक विमा शेतकर्यांच्या खाती तातडीने जमा करा
करावा.अनेक ठिकाणी गारा पडल्या असून सोसाट्याच्या वार्याने मोठे नुकसान झाले आहे.
कोणतीही अट न लावता सरसकट पंचनामे करून शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी
शेतकरी वर्गातून होत आहे.

Post a Comment