अहिल्यानगर - स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे आहे. महायुतीकडून भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीविषयी विविध तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. त्यामुळे तनपुरे यांनी जर ऐनवेळी माघार घेतली किंवा अपक्ष उमेदवारी केली तर काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीचा उमेदवार देण्याची तयारी केली आहे. राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्यांची नावेही प्रदेश कमिटीला कळविण्यात आली असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी सांगितले.
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघासाठी १ एप्रिलपासून उमेदवारी अर्जांची विक्री सुरु करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १०२ उमेदवारी अर्ज ५९ इच्छूकांकडून घेण्यात आले आहेत. तर एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी भाजपाकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, अद्याप कर्डिले व तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगण्यात येते. तनपुरे अपक्ष उमेदवारी करतील, अशाही चर्चा सुरु आहेत.
तनपुरे यांनी मात्र, याबाबत अद्याप काहीही खुलासा केलेला नाही. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तनपुरे यांची हिंदुत्ववादी भूमिका प्रखरतेने समोर आली आहे. तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वी जनआशिर्वाद यात्रा काढली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तुतारी चिन्ह कोठेही वापरले नव्हते किंवा त्यांनी पक्षाचे नावही वापरले नव्हते. तसेच त्यांनी डोक्यात भगवी टोपी घातलेली होती. त्यामुळे तनपुरे हे हिंदू मते मिळविण्यासाठी अपक्ष उमेदवारी करतील, अशी चर्चा राहुरीत रंगलेली आहे.
तनपुरे हे जर अपक्ष उभे राहिले तर काँग्रेस व उद्धव ठाकरे शिवसेना हे महाविकास आघाडी म्हणून उमेदवार देणार आहेत. तशी तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसच्या प्रदेश कमिटीकडून राहुरीतून कोण कोण इच्छूक आहेत, याबाबत माहिती मागविली होती. काँग्रेसकडून सुरेश लांबे, मकासरे, अॅड. म्हसे यांची नावे प्रदेशकडे पाठविल्याचे सांगण्यात आले. त्यास गुजर यांनी दुजोरा दिला आहे.

Post a Comment