अहिल्यानगर - नगर तालुक्यातील जेऊर शिवारात घुरुडी डोंगरावर असलेल्या अवादा कंपनीच्या सोलर प्रकल्पातून २ लाख रुपये किंमतीची कॉपर केबल चोरून नेणाऱ्या रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेंडी बायपास रोडवर सापळा लावून पकडले आहे. या टोळीकडून चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी त्यांच्या कडून ९ लाख ९१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
संतोष अशोक जाधव (वय २८, रा. हायस्कुल जवळ प्रवरासंगम, ता.नेवासा), करण वैश्य भोसले (वय २०, रा. भेंडाळा ता.गंगापुर जि. अहिल्यानगर), मनोज सुनिल लिंभोरे (वय २३, रा. कहारगल्ली, प्रवरासंगम, ता.नेवासा), परमेश्वर वैश्य भोसले (वय ३९, रा. भेंडाळा, ता. गंगापुर, जि.छत्रपती संभाजीनगर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. या सोलर प्रकल्पातून १८ मार्च च्या रात्री कॉपर केबल चोरीला गेली होती. याबाबत १९ मार्च रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, अतुल लोटके, फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक अरुण मोरे यांचे पथक करत होते.
सदर पथक तपास करत असताना सदरचा गुन्हा हा रेकार्डवरील आरोपी संतोष अशोक जाधव याने त्याचे साथीदारासह केला असुन तो शेंडी बायपास रोडने पांढऱ्या रंगाच्या पिकअप व मोटार सायकलवर तांबे धातुची ताराची विक्री करण्यासाठी नगरच्या दिशेने येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ शेंडी बायपास रोडलगत किनारा हॉटेलजवळ सापळा रचुन थांबले असता शेंडीकडुन दुध डेअरी चौकाकडे एक संशयित पिकअप व मोटार सायकल येतांना दिसुन आले. पथकाने सदर दोन्ही वाहने थांबवुन चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून २०० किलो तांब्याचे धातुचे तारा, एक महिंद्रा पिकअप, एक मोटार सायकल, एक कटर व एक स्क्रु ड्रायव्हर, वेगवेगळ्या कंपनीचे ४ मोबाईल असा एकुण ९ लाख ९१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Post a Comment