पारनेर - पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गंगाराम बेलकर तर उपसभापतीपदी संदीप सालके यांची ९ एप्रिल रोजी बिनविरोध निवड झाली आहे. निवड जाहीर होताच बाजार समिती परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.
माजी सभापती किसनराव रासकर आणि उपसभापती किसनराव सुपेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही पदे रिक्त झाली होती. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास जाधव यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
गंगाराम बेलकर हे तालुक्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली असून, प्रशासनाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या पत्नी सौ. अरुणा बेलकर यांनीही पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीकडे स्थिर आणि अनुभवी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. उपसभापतीपदी निवड झालेले संदीप सालके हे खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे विश्वासू व जुने सहकारी म्हणून ओळखले जातात. एका निष्ठावान युवा कार्यकर्त्याला संधी देऊन खासदारांनी तरुण नेतृत्वाला चालना दिल्याचे बोलले जात आहे.
या निवडीपूर्वी खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत बेलकर आणि सालके यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आणि त्यानुसार निवड बिनविरोध पार पडली. तीन वर्षांपूर्वी खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीत सत्तांतर झाले होते. सुरुवातीला बाबासाहेब तरटे आणि बापू शिर्के यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर किसनराव रासकर आणि किसनराव सुपेकर यांनी कार्यभार सांभाळला. आता तिसऱ्या टप्प्यात बेलकर आणि सालके यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे.
निवडीची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी माजी सभापती बाबासाहेब तरटे, किसनराव रासकर, किसन सुपेकर, बापूसाहेब शिर्के, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, डॉ. बाळासाहेब कावरे, नगरसेवक योगीराज गाडे, रा. या. औटी, अशोक कटारिया, पद्मजा पठारे, छाया रोकडे, बाबासाहेब नर्हे, चंदन भळगट, विजय पवार, आबासाहेब खोडदे, सरपंच प्रकाश गाजरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते मोहनराव रोकडे, जितेश सरडे, सचिन पठारे, रवींद्र राजदेव, शहराध्यक्ष संदीप मते, रायभान औटी, शिवाजी बेलकर, उद्योजक संतोष गायखे, बाळासाहेब खिलारी, श्रीरंग रोकडे, रवींद्र गायखे, तुकाराम चव्हाण, संदीप चौधरी, भूषण शेलार, बाळासाहेब दिघे, पंकज बेलकर, चैतन्य बेलकर, अॅड. गणेश कावरे, लखन ठाणगे, गणेश गायखे, रामदास साळवे, प्रमोद गुगळे, शिवाजी भोसले, बाळासाहेब दाते, शांताराम बेलकर, अरुण बेलकर यांच्यासह सर्व संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment