राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या प्रकल्प संचालकाला मागितली दरमहा ५० हजारांची खंडणी


अहिल्यानगर - भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक अमरीश माणिकराव मानकर यांना कार्यालयात घुसून धमकावत दरमहा ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात किरण शिवाजी राऊत, संदीप भास्कर भगत आणि ॲड. हर्षद चावला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अमरीश मानकर हे मार्केटयार्ड येथील 'एनएचएआय' कार्यालयात प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर ते मनमाड रस्ते विकासाचे काम सुरू आहे. ६ एप्रिल रोजी किरण राऊत, संदीप भगत आणि हर्षद चावला हे विनापरवाना कार्यालयात घुसले. "तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, जर काम करायचे असेल तर दरमहा ५० हजार रुपये द्यावे लागतील," अशी धमकी त्यांनी मानकर यांना दिली. त्यानंतर ८ एप्रिल रोजी पुन्हा राऊत आणि भगत कार्यालयात आले आणि पैशांची विचारणा करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

तसेच किरण राऊत याने फोनवरून कंत्राटदारांची बिले न काढण्याची धमकी दिली होती. आरोपींनी महामार्गावर काम करणाऱ्या इंजिनिअर व कामगारांचे विनाकारण फोटो काढून त्यांना त्रास दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून मानकर यांनी कायदेशीर तक्रार दिली असून, पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान यातील संशयित आरोपी ॲड. हर्षद चावला याच्यावर एकाच दिवशी खंडणी मागितल्या प्रकरणी तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यात २ वेगवेगळे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झालेला आहे. याबाबत एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मुलीने फिर्याद दिली आहे.

पीडित डॉक्टर तरुणी ६ एप्रिल रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास सिव्हील हॉस्पिटल येथील सिव्हील सर्जन कार्यालयासमोर दुचाकी पार्किंगमध्ये नोकरीचा अर्ज देण्यासाठी आली होती. यावेळी आरोपी हर्षद चावला याने तिचा पाठलाग केला. पीडितेचे आणि तिच्या डॉक्टर बहिणीचे खाजगी व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगून ते सार्वजनिक करण्याची धमकी त्याने दिली.

या व्हिडिओच्या बदल्यात आरोपीने दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास संपूर्ण कुटुंबाची बदनामी करण्याची आणि दोन्ही बहिणींचे वैद्यकीय क्षेत्रातील करिअर संपवून टाकण्याची धमकी त्याने दिली. त्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर सायंकाळी एनएचएआय चे प्रकल्प संचालक मानकर यांच्या फिर्यादी वरून कोतवाली पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

 


0/Post a Comment/Comments