नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील नारायणडोहो, बाबुर्डी घुमट, पारगाव मौला तसेच परिसरातील गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा सुमारे ४५ वर्षांपासून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या पुढाकारामुळे रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून कामाला सुरुवात झाली असून ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. याबद्दल ग्रामस्थांनी स.पो.नि.वारुळे यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
सोलापूर महामार्गाजवळील पारगाव मौला फाटा ते बाबुर्डी घुमट फाटा या रस्त्यासाठी गेल्या चार ते पाच दशकांपासून ग्रामस्थ प्रयत्न करत होते. मात्र अवघ्या १०० मीटर रस्त्याच्या वादामुळे नारायणडोहो, बाबुर्डी घुमट, पारगाव मौला आदी गावांतील नागरिकांना सुमारे तीन किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. या प्रश्नासाठी ग्रामस्थांनी महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि पंचायत समितीकडे वारंवार पाठपुरावा केला होता. भूमी अभिलेख विभागाने पाच वर्षांपूर्वी मोजणी करून येथे नियमानुसार रस्ता असल्याचा अहवाल दिला होता; मात्र काही रहिवाशांच्या विरोधामुळे प्रश्न प्रलंबित राहिला.
शासनाच्या नोंदीप्रमाणे हा रस्ता अस्तित्वात असल्याने जिल्हा परिषद व स्थानिक विकास निधीतून तीन वेळा रस्त्याचे काम मंजूर होऊन निधीही उपलब्ध झाला होता. परंतु अतिक्रमणांमुळे काम सुरू होऊ शकले नाही आणि निधी परत गेला. सुमारे १० ते १५ शेतकरी आणि चार-पाच कुटुंबांच्या विरोधामुळे रस्त्यावर अडथळे निर्माण झाले होते. काही ठिकाणी बांबूची झाडे लावून तसेच दगड टाकून मार्ग बंद करण्यात आला होता, त्यामुळे मोठ्या वाहनांची वाहतूक थांबली होती.
दरम्यान, पारगाव मौलाचे सरपंच वैभव बोठे यांनी ग्रामस्थांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. वारुळे यांनी संबंधितांना पोलीस ठाण्यात बोलावून कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. त्यानंतर अतिक्रमणधारकांनी माघार घेतली आणि दोन दिवसांपूर्वी अतिक्रमणे काढण्यात आली. सध्या रस्त्याचे काम सुरू झाले असून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

Post a Comment