सुपा - नगर-पुणे महामार्गावर नगरहून पुण्याकडे चाललेल्या टेम्पोला मारुती स्विफ्ट कार आडवी लावून टेम्पोचालकाला तिघांनी मारहाण करत लुटल्याची घटना ८ एप्रिल रोजी रात्री ८.३० च्या सुमारास सुप्याजवळील पवारवाडी घाटात घडली. या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात ३ अनोळखी लुटारुंच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत टेम्पोचालक जितेंद्र भाऊसाहेब गवळी (वय ३०, रा. गवळीवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी गवळी हे ८ एप्रिल रोजी सायंकाळी त्यांचा आयशार टेम्पो (क्र. एम एच-२३ डीपी ३६८७) हा भाडे भरणेसाठी पुणे येथे नगर मार्गे घेवुन जात असताना रात्री ८.३० च्या सुमारास सुप्याच्या अलीकडील पवारवाडी घाटात अचानक पणे त्यांचे टेम्पोचे बाजूने एक लाल रंगाची स्विफट कार येवुन फिर्यादी यांना गाडी थांबवण्यास सांगितली. सदर स्विफ्ट कार मधुन अंदाजे ३० ते ३५ वयाचे, गोरे रंगाचे तीन इसम हे फिर्यादी जवळ येवून पैशाची मागणी करू लागले.
तेव्हा फिर्यादी हे त्यांना माझे कडे पैसे नाहीत असे म्हणाले असता त्यांनी फिर्यादी गवळी यांना मारहाण करून त्यांच्या खिशातून बळजबरीने ३० हजारांची रोकड काढून घेतली. त्यानंतर कानातील सोन्याची बाळी व हातातील अंगठी ही काढून घेवून तेथून निघून गेले. या घटनेनंतर गवळी यांनी सुपा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच परिसरात कारचा शोध घेतला. मात्र लुटारू मिळून आले नाहीत. त्यानंतर गवळी यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात लुटारुंच्या विरुद्ध बीएनएस कलम ३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment