गावातील सप्ताहाच्या जेवणाच्या पंगतीत किरकोळ वादातून बाप-लेकावर तिघांचा हल्ला


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील साकेवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या जेवणाच्या पंगतीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून बाप-लेकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी अविनाश लहानू पालवे, योगेश अंबादास पालवे आणि सतीश लहानू पालवे (सर्व रा. साकेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अनिल पांडुरंग पालवे यांनी फिर्याद दिली आहे. सप्ताहाच्या पंगतीत पाण्याची कळशी घेतल्याच्या कारणावरून अविनाश पालवे याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली होती. याचा जाब विचारला असता, आरोपीने लाकडी काठीने फिर्यादीच्या हातावर प्रहार केला. इतक्यावरच न थांबता आरोपीने फिर्यादीचा मुलगा आदित्य याच्या डोक्यात विटाने मारून त्याला जखमी केले.

या भांडणात योगेश पालवे आणि सतीश पालवे यांनीही फिर्यादीला शिवीगाळ करत त्यांची दुचाकी लाथ मारून खाली पाडली व गाडीचे नुकसान केले. 'पुन्हा आमच्या नादाला लागलात तर हातपाय तोडू', अशी धमकी देऊन आरोपींनी दहशत निर्माण केली. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी मारहाण आणि धमकी दिल्याबद्दल गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सुशांत दिवटे करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments