अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांवर तिखट शब्दांत हल्लाबोल केला. "ही लढत वंचित आणि भाजप यांच्यातच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा फक्त डमी आहे", असा थेट आरोप करत त्यांनी निवडणुकीचा रंग अधिकच चढवला.
आंबेडकर म्हणाले, "ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच प्राजक्ता तनपुरे यांना उमेदवारी दिली नाही. भाजपने दबाव आणला, हा केवळ दिशाभूल करणारा प्रचार आहे." याचवेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर संशय व्यक्त करत "अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात साधी एफआयआरही दाखल झाली नाही. यात काहीतरी काळेबेरे आहे का?", असा थेट सवाल उपस्थित केला.
घराणेशाही वाढली तर लोकशाही संपते आणि हुकूमशाही सुरू होते, असा इशारा देत आंबेडकरांनी मतदारांना सावध राहण्याचे आवाहन केले. तसेच मुस्लिम समाजाला 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन करत त्यांनी निवडणुकीत मोठी उलथापालथ घडवण्याचा इशाराच दिला.
खरात प्रकरणावरून विखेंना आव्हान
अशोक खरात प्रकरणावर बोलताना प्रकाश आंबेडकरांनी भाजप आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत वातावरण आणखी तापवले. "भोंदूगिरी आणि पारंपरिक व्यवसाय यात फरक आहे. आजच्या काळात काही जण अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांचे शोषण करत आहेत. अशा फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे", असे त्यांनी ठणकावले. तसेच "अशोक खरात हा नेमका कुणाचा नातेवाईक आहे, हे विखे पाटलांनी जाहीर करावे", असे थेट आव्हान देत खरात यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

Post a Comment