'खोक्या' ची न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता, वर्षभरानंतर आला जेल मधून बाहेर



बीड - बीड न्यायालयाने सतीश उर्फ खोक्या भोसले याला हत्येचा प्रयत्न प्रकरणात निर्दोष ठरवून मोठा दिलासा दिला आहे. एक वर्ष कारागृहात राहिल्यानंतर त्याची सुटका झाली असून या निर्णयामुळे जिल्ह्यात चर्चा रंगल्या आहेत. न्याय देवतेने मला न्याय दिला, असे म्हणत त्याने दिलासा व्यक्त केला. तसेच, मला जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका नेत्याला लक्ष्य करण्यासाठी आदिवासी समाजातील मला टार्गेट करण्यात आले, असेही त्याने म्हटले आहे.

सुमारे वर्षभरापूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर ढाकणे पिता-पुत्रावर हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी त्याला अटक करून छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात ठेवले होते. दीर्घ सुनावणीनंतर बीड न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे भोसले याला या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर काल त्याची अधिकृत सुटका झाली आणि आज तो कारागृहाबाहेर आला.

दरम्यान, भोसले याच्याशी संबंधित आणखी एक प्रकरणही चर्चेत आहे. एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा त्याचा व्हिडिओ काही काळापूर्वी व्हायरल झाला होता. या घटनेप्रकरणी त्याच्यावर वेगळा गुन्हा दाखल असून तो सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्या प्रकरणात भोसलेला जामीन मिळालेला आहे. त्यामुळे हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपातून मुक्तता मिळाली असली तरी इतर प्रकरणांमुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरूच आहे.

काही लोक वातावरण बिघडवत असल्याचा आरोप

न्यायालयाच्या निर्णयानंतर भोसलेने माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. न्याय देवतेने मला न्याय दिला, असे म्हणत त्याने दिलासा व्यक्त केला. तसेच, मला जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका नेत्याला लक्ष्य करण्यासाठी आदिवासी समाजातील मला टार्गेट करण्यात आले, असा आरोपही त्याने केला. पुढे बोलताना त्याने कुटुंबावर तीन वेळा हल्ले झाल्याचा दावा केला. आयुष्यभराची कमाई लावून उभारलेलं घर पाडण्यात आलं. गेल्या एका वर्षात माझ्या कुटुंबाने खूप त्रास सहन केला, असेही सांगितले. जिल्ह्यातील जातीयवाद आणि राजकीय वैमनस्यामुळे काही लोक वातावरण बिघडवत असल्याचा आरोप करत भोसलेने या प्रकरणाला वेगळं वळण दिलं आहे.


 

0/Post a Comment/Comments