जामखेड - मुलगा व मुलीचा जन्मदाखला काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून ३ हजारांची लाच घेताना जामखेड नगरपरिषदेच्या २ कर्मचाऱ्यांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. नगरपरिषद कार्यालय परिसरात ६ मे रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.
जन्म मृत्यु नोंदणी विभागातील लिपिक अभिजीत जालिम भैसडे (वय ३९, रा. तपनेश्वर गल्ली, मारूती मंदिरासमोर, जामखेड) व अग्निशामक दलातील मदतनीस (कंत्राटी) अहमद इलियास शेख (वय ४३, रा. काझी गल्ली, मश्जिद समोर, खर्डा रोड, जामखेड)अशी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
सविस्त माहिती अशी की, तक्रारदार यांनी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जामखेड नगरपरिषद येथे त्यांचा मुलगा व मुलगी यांचे जन्म दाखला मिळणे करीता आवश्यक कागदपत्र जोडुन अर्ज दिला होता व मुलांचा जन्म दाखला मिळणे कामी त्यांनी लोकसेवक भैसडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी लोकसेवक भैसडे यांनी लोकसेवक शेख यांना संपर्क करण्यास सांगितले असता त्याप्रमाणे तक्रारदार यांनी लोकसेवक भैसडे यांचे सांगणेवरून लोकसेवक शेख यांना संपर्क केला असता लोकसेवक शेख हे तक्रारदार यांचेकडे दोन्ही मुलांचा जन्मदाखला देण्याकरीता लोकसेवक भैसडे यांचेकरीता प्रत्येक दाखल्याचे १५०० रूपये याप्रमाणे दोन जन्म दाखल्यांचे ३,००० रूपये लाचेची मागणी करत असल्याची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात ५ मे रोजी प्राप्त झाली होती.
या तक्रारी नुसार ६ मे रोजी दुपारी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी शेख याने भैसडे यांचे यांच्या साठी ३ हजाराची लाच मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर नगपरिषद समोर सापळा लावण्यात आला त्यावेळी शेख यास तक्रारदाराकडून ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या स्विकारलेल्या लाच रक्कमेस लोकसेवक भैसडे यांनी समती दर्शवुन लाच स्विकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोघांच्या विरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अ, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उप अधिक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजु आल्हाट, पो.ना. चंद्रकांत काळे, पो.कॉ. किशोर कुळधर, पो.कॉ. शेखर वाघ, चालक पो.हे.कॉ. दशरथ लाड यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment