नगर ‘हा’ घाट बनलाय मृत्यूचा सापळा, पुन्हा भीषण अपघातात एक जागीच मृत्यू ठार


अहिल्यानगर - मृत्यूचा सापळा बनलेल्या नगर - पाथर्डी रोडवरील करंजी घाटात ५ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगातील महिंद्रा थार गाडीने रिक्षाला समोरून दिलेल्या धडकेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. यशवंत बन्सी पुरी (वय ४५, रा. धायरी, पुणे) असे मयत रिक्षाचालकाचे नाव आहे.

महिंद्रा थार गाडी ही नगरहून पाथर्डीच्या दिशेने जात होती. तर रिक्षा पाथर्डी हून नगरच्या दिशेने घाट चढून वर येत होती. करंजी कडे जाताना घाट सुरु झाल्यावर गव्हाणे बाबा मंदिराच्या साधारण २०० मीटर पुढे असलेल्या दुसऱ्या वळणावर थार गाडी चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने गाडीने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोराची धडक दिली. या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झाला. तर रिक्षाचालक यशवंत पुरी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादी वरून परळी (जि.बीड) येथील महिंद्रा थार गाडी चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

गेल्या काही महिन्यांपासून करंजी घाटात अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अरुंद रस्ते, धोकादायक वळणे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे प्रवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत. घाटाच्या खराब स्थितीमुळे अजून किती निष्पाप बळी जाणार? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

करंजी घाटात सतत होणाऱ्या अपघातांमुळे हा परिसर 'ब्लॅक स्पॉट' बनला आहे. मागील महिन्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे वाहतूक ठप्प झाली होती, ज्यात ट्रक आणि पिकअपच्या धडकेत अनेक जण जखमी झाले या घाटात धोकादायक वळणे आणि ब्रेक निकामी झाल्यामुळे ट्रक उलटणे, समोरासमोर धडक होणे अशा घटना वारंवार घडतात.


 

0/Post a Comment/Comments