मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने एक अभिनव योजना आखली आहे. राज्यातील सर्व प्रमुख रस्ते आणि महामार्गांवरील टोल नाक्यांच्या परिसरात आता सुसज्ज 'कृषी मॉल' उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी लांबच्या बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागणार नाही, तर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना थेट शेतातून आलेली ताजी फळे आणि भाजीपाला खरेदी करता येणार आहे.
अनेकदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा शहरांमधील बाजारपेठेत नेण्यासाठी मोठा वाहतूक खर्च करावा लागतो. तसेच प्रवासात बराच वेळ आणि श्रम वाया जातात. आता टोल नाक्यांवरच विक्रीची सोय उपलब्ध झाल्याने, शेताच्या जवळच हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च शून्यावर येईल आणि नफ्यात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ग्राहकांसाठी 'स्वस्त आणि मस्त' खरेदी
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा दर्जेदार आणि ताजी फळे किंवा भाजीपाला मिळत नाही. मात्र, या कृषी मॉल्समुळे प्रवाशांना मध्यस्थांशिवाय थेट शेतकऱ्यांकडून माल घेता येईल. कोणत्याही मध्यस्थाचा हस्तक्षेप नसल्यामुळे बाजारपेठेच्या तुलनेत येथे शेतमाल स्वस्त दरात मिळण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशालाही दिलासा मिळणार आहे.
आठवडी बाजारानंतरचे मोठे पाऊल
यापूर्वी राज्यात शहरांमध्ये 'थेट शेतकरी ते ग्राहक' हा आठवडी बाजाराचा प्रयोग यशस्वी झाला होता. त्याच धर्तीवर आता महामार्गावरील ही नवीन बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी ठरू शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मॉल्सच्या बांधकामासाठी हालचाली सुरू केल्या असून, लवकरच प्रत्येक टोल नाक्यावर ही सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे.

Post a Comment