नाशिक - नाशिक शहरातील जेलरोड परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संसार सुखाचा व्हावा म्हणून माहेरकडून लाखो रुपये आणि सोनं देऊनही एका विवाहितेला सासरच्या छळाला सामोरं जावं लागलं. अखेर सततचा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन न झाल्याने तिने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं. या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली आहे.
मृत महिलेचं नाव आशा प्रवीण घोटेकर असं असून, त्यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, लग्नानंतर काही काळातच आशा यांचा छळ सुरू झाला होता. सासरच्यांकडून फ्लॅट खरेदीसाठी आणि चारचाकी वाहन घेण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. बहिणीचा संसार टिकावा आणि तिचं आयुष्य सुखात जावं या आशेने तिच्या भावाने स्वतःच्या आईच्या नावावर असलेली जमीन विकली आणि सासरच्यांना मोठी रक्कम दिली. इतकंच नव्हे तर लग्नावेळी 21 तोळे सोनंही देण्यात आलं होतं.
मात्र एवढं सगळं करूनही सासरच्यांची मागणी आणि त्रास थांबला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. आशा घोटेकर यांना वारंवार मानसिक त्रास दिला जात होता. घरातील वातावरण कायम तणावपूर्ण ठेवलं जात होतं. तक्रारीनुसार, पती प्रवीण घोटेकर याचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या कारणावरूनही आशा यांना सतत अपमान आणि त्रास सहन करावा लागत होता. कौटुंबिक वादातून त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचंही नातेवाईकांनी म्हटलं आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आशा यांना जादूटोण्याच्या नावाने धमकावलं जात होतं. तुला जादूटोणा करून संपवून टाकू, अशा प्रकारच्या धमक्या त्यांना वारंवार दिल्या जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सततचा छळ, मानसिक दबाव आणि कौटुंबिक त्रास यामुळे त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. अखेर या सगळ्याला कंटाळून त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचं पोलिस तपासात समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात असून आर्थिक व्यवहार, कौटुंबिक वाद आणि छळाच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
दरम्यान, या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेचा आणि हुंडाबळीच्या वाढत्या घटनांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. लग्नानंतरही महिलांवर आर्थिक मागण्यांसाठी होणारा छळ थांबत नसल्याचं या प्रकरणातून समोर आलं आहे. लाखो रुपये आणि सोनं देऊनही एका विवाहितेला न्याय आणि सन्मानाचं आयुष्य मिळालं नाही, ही अत्यंत वेदनादायक बाब असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Post a Comment