15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा इंग्लंडमध्ये धुमाकूळ! चौकार-षटकारांचा पाऊस



लंडन - भारतीय क्रिकेटचा नवा उगवता तारा आणि अवघ्या 15 वर्षांचा तुफानी फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या इंग्लंडमध्ये आपल्या बॅटिंगने सर्वांना थक्क करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैभवचा पदार्पण कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर अजून मिळाले नसले, तरी या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या बॅटने सर्वांना चोख उत्तर दिले आहे. इंग्लंडविरुद्ध चेस्टर-ले-स्ट्रीट येथे होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी वैभवने नेट्समध्ये तासनतास सराव केला आणि मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्या या वादळी फलंदाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय गोलंदाजांची धुलाई

नेट्समध्ये सराव करताना वैभव सूर्यवंशीने भारतीय गोलंदाज आणि थ्रो-डाऊन स्पेशालिस्टचा खरपूस समाचार घेतला. सुरुवातीला त्याने काही ग्राउंड शॉट्स खेळले, पण एकदा का हात सेट झाल्यावर त्याने थेट हवाई हल्ले चढवण्यास सुरुवात केली. स्टार स्पोर्ट्सने सोशल मीडियावर त्याचा 22 सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अप्रतिम लयमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांकडून त्याला लवकरात लवकर प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पदार्पणाची प्रतीक्षा कायम; श्रेयस अय्यरचे संकेत

वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची उत्सुकता केवळ चाहत्यांनाच नाही, तर जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांनाही लागली आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. आता इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत त्याला संधी मिळणार का, हा मोठा प्रश्न आहे.

याबाबत कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्ट केले आहे की, आयर्लंडविरुद्ध पराभूत झालेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तो लगेच बदल करणार नाही. अय्यरच्या मते, ज्या खेळाडूंनी भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून दिला आहे, त्यांचा आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी त्यांना सलग संधी देणे आवश्यक आहे. तरीही, 5 सामन्यांची ही मोठी मालिका असल्याने वैभवला किमान एका सामन्यात तरी संधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आयपीएल 2026 मध्ये गाजवले होते मैदान

वैभव सूर्यवंशी सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याने सर्वाधिक 776 धावा ठोकल्या होत्या. विशेष म्हणजे, या 15 वर्षांच्या मुलाने स्पर्धेत सर्वाधिक 72 षटकार ठोकले आणि त्याचा स्ट्राईक रेट 237.30 चा होता. त्यानंतर इंडिया ए कडून खेळताना श्रीलंकेतील तिंरगा मालिकेच्या अंतिम सामन्यात त्याने अवघ्या 29 चेंडूत 94 धावांची वादळी खेळी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.


 

0/Post a Comment/Comments