जिल्हा बँकेत संचालकपदी विजयानंतर खा.नीलेश लंकेंची पहिली एन्ट्री ठरली लक्षवेधी



अहिल्यानगर - जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर रोजी खा. नीलेश लंके यांची जिल्हा बँकेतील पहिलीच एन्ट्री लक्षवेधी ठरली. पारनेर सोसायटी मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून खा. लंके दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संचालक मंडळाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिले. त्यांनी बैठकीच्या प्रोसिडिंग बुकवर स्वाक्षरी केली आणि त्यानंतर तेथून निघून गेले. विशेष म्हणजे, स्वाक्षरीनंतर संबंधित अधिकाऱ्याने त्यांना संचालक म्हणून देय असलेले मानधनाचे पाकीट देऊ केले. मात्र, खा. लंके यांनी दोन्ही हात जोडून नम्रपणे मानधन स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्या या कृतीची बँकेच्या वर्तुळात विशेष चर्चा रंगली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पारनेर सोसायटी मतदारसंघातील लढत संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधणारी ठरली होती. या अटीतटीच्या लढतीत खा. नीलेश लंके यांनी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचे समर्थक राहुल शिंदे पाटील यांचा तब्बल २४ मतांनी पराभव केला. खा. लंके यांना ६४ मते मिळाली, तर शिंदे पाटील यांना ४० मतांवर समाधान मानावे लागले. या विजयातून लंके यांनी पारनेर तालुक्यातील आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.

या निवडणुकीत स्वतः डॉ. सुजय विखे यांनी लक्ष घातल्याने सुरुवातीपासूनच राजकीय प्रतिष्ठेची लढाई निर्माण झाली होती. अगदी सहलीवर पाठविण्यात आलेले मतदारही विखे समर्थकांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यामुळे ही लढत केवळ लंके विरुद्ध शिंदे पाटील अशी मर्यादित न राहता अप्रत्यक्षपणे खासदार नीलेश लंके विरुद्ध माजी खासदार डॉ. सुजय विखे अशीच बनली होती.

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रक्रियेत डॉ. विखे यांनी जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या प्रक्रियेत खा. लंके यांना बाजूला ठेवण्यात आल्याची राजकीय चर्चा होती. मात्र, या सर्व घडामोडींनंतरही लंके यांनी पारनेर मतदारसंघातील लढतीत आपले राजकीय कसब पणाला लावत विजय मिळविला.

या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर रोजी जिल्हा सहकारी बँकेच्या बैठकीसाठी खासदार लंके यांनी लावलेली उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीत केवळ प्रोसिडिंग बुकवर स्वाक्षरी करून बाहेर पडणे आणि त्यानंतर मानधनाचे पाकीटही स्वीकारण्यास नकार देणे, या दोन्ही बाबींमुळे त्यांची जिल्हा बँकेतील पहिलीच उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर जिल्हा बँकेच्या राजकारणात लंके यांची पुढील भूमिका काय असणार, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.



0/Post a Comment/Comments