अहिल्यानगर
- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या
माध्यमातून केडगाव येथे संत रोहिदास विकास केंद्र उभारण्याचे काम पूर्ण करणाऱ्या
शासकीय ठेकेदाराकडे उर्वरित प्रलंबित निधीचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यासाठी आणि
तो मंजूर करून घेण्यासाठी तब्बल ७५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या समाज कल्याण
निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जेरबंद केले आहे. सहायक आयुक्तांच्या कार्यालयातच १२
नोव्हेंबर रोजी ही सापळा कारवाई करण्यात आली आहे. संदीप
हरिभाऊ फुंदे असे या लाचखोर समाज कल्याण निरीक्षकाचे नाव आहे,
मिळालेल्या
माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय
ठेकेदार म्हणून काम करत असून त्यांनी महापालिकेच्या हद्दीतील केडगाव येथील सर्व्हे
नंबर ४९/२ आणि ५०/१ मधील महानगरपालिकेच्या जागेत संत रोहिदास विकास केंद्र
उभारण्याचे काम पूर्ण केले होते. या कामापोटी त्यांना
यापूर्वी २५ लाख रुपये मिळाले असून, उर्वरित २४ लाख ८० हजार
९८४ रुपयांच्या निधीच्या मागणीसाठी मनपाकडून समाज कल्याण विभागाकडे पत्रव्यवहार
करण्यात आला होता.
हा
प्रलंबित दायित्व निधी मंजूर करून घेण्यासाठी व मंत्रालयातून प्रस्ताव मार्गी
लावण्यासाठी समाज कल्याण कार्यालयातील निरीक्षक संदीप हरिभाऊ फुंदे याने ५
नोव्हेंबर २०२६ रोजी तक्रारदाराला फोन करून कार्यालयात बोलावून घेतले. मंत्रालयातून निधी मागवण्यासाठी आणि पुढील
प्रक्रिया करून घेण्यासाठी ७५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी
मागणी त्याने केली होती.
याबाबत
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी समाजकल्याण
कार्यालयात लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणी
दरम्यान आरोपी लोकसेवक संदीप हरिभाऊ फुंदे (समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण कार्यालय, अहिल्यानगर) याने पंचांसमक्ष
७५ हजार रुपयांची लाच मागितली आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच दिवशी सापळा रचून आरोपी संदीप फुंदे याला
तक्रारदाराकडून ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. आरोपीला दुपारी ४:२२ वाजता ताब्यात घेण्यात
आले असून, याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्याची आला आहे.

Post a Comment