जिल्हा बँकेत पहिल्याच दिवशी हातात नांगर घेऊन जाणार, बँकेतील कारभार चव्हाट्यावर आणणार’- खा. निलेश लंके



पारनेर (प्रतिनिधी) - अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा बँकेत पहिल्याच दिवशी हातात नांगर घेऊन जाणार असून, बँकेच्या माध्यमातून कारखानदारांना कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली जात असतील, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही कर्ज मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बँकेतील कारभारातील अनियमितता चव्हाट्यावर आणल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला.

पारनेर तालुक्यातील पठार भागातील किन्ही येथे मंगळवारी (दि. १० नोव्हेंबर) किन्ही विविध विकास सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीसह विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल खासदार निलेश लंके यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना लंके म्हणाले की, जिल्हा बँकेत कारखानदारांना सुमारे २८५० कोटी रुपयांची बोगस कर्जे वाटप करण्यात आली, तर काहींना हातावर कर्ज दिल्याचे प्रकार आहेत. या सर्व बाबींचा जाब विचारण्याची माझी भूमिका राहणार आहे. बँकेत गेल्यानंतर माझ्या हातात नांगर असेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार आहे. धनदांडग्यांशी माझे नाते नाही, तर गोरगरीब जनतेशी माझे नाते आहे. मी शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसेल, तर मला बँकेत जाण्याचा अधिकार नाही.

मोठ्या लोकांच्या मुलांना कारखाने उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळते; मात्र शेतकऱ्यांच्या मुलांनीही उद्योजक झाले पाहिजे, त्यांना व्यवसाय उभारण्यासाठी बँकेने पाठबळ दिले पाहिजे, ही माझी भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करताना कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने मला मोठी मदत केली. सर्व स्तरांतून मिळालेल्या सहकार्यामुळेच ही निवड शक्य झाली. यापुढील काळात तालुक्यातील प्रत्येक निवडणूक मायक्रो प्लॅनिंग करून लढवली जाईल. सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी संघटितपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना लंके म्हणाले की, आम्ही सत्तेत कधी बसतो, याची मी वाट पाहत आहे. मात्र, समोरच्यांना हटवूनच सत्तेत बसणार, त्यांच्यात जाऊन बसणार नाही. राजकारणात दिवस कधी बदलतील, हे सांगता येत नाही. सध्या झालेल्या निवडणुकांनंतर जनतेचा विचार बदलत असल्याचे दिसत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने ठोस निर्णय घेतले नाहीत, त्यामुळे सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असून, या काळात सर्वसामान्य शेतकरी वर्गाला मदत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

किन्ही येथे विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

या कार्यक्रमात किन्ही विविध विकास सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीसाठी २० लाख रुपये, गोरेगाव-कानूर पठार रस्त्यासाठी एक कोटी २३ लाख रुपये, तर किन्ही-सोनांबी रस्त्यासाठी ४८ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून किन्ही परिसरात यापूर्वीही सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी खासदार निलेश लंके यांचे गावात ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांची लाडू तुला करून नागरी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर, ज्येष्ठ नेते मारुती रेपाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविंद्र राजदेव, दीपक लंके, माजी सभापती किसन रासकर, युवा नेते किरण ठुबे, विकास उर्फ बंडू रोहकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे, सचिन पठारे, अभयसिंह नांगरे, उपसरपंच प्रसाद नवले, रामभाऊ तराळ, सकलेन पठाण, बापू चत्तर, सतीश भालेकर, सरपंच अभिजित झावरे, लखन ठाणगे, शिवाजी मोरे, सावरकर शिंदे, डॉ. संतोष गुंजाळ, सत्यम निमसे, दत्ता गुंड, सौरभ रेपाळे आदींसह निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किन्ही बहिरोबावाडी येथे निलेश लंके प्रतिष्ठान, किन्ही-बहिरोबावाडी, सद्गुरू ओंकार बाबा मित्र मंडळ, भैरवनाथ मित्र मंडळ, चंदूभाऊ मित्र मंडळ आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, किन्ही यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



0/Post a Comment/Comments