अहिल्यानगर (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील देहरे गावातील महिलेशी इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर तिला ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून ताब्यात घेत अटक केली आहे. तन्वीर शफीक शेख (वय २९, रा. हनुमान मंदिर, देहरे) आणि सोहेल रियाज शेख (वय २५, रा. देहरे) अशी त्यांची नावे आहेत.
१४ मार्च रोजी पीडितेची इन्स्टाग्रामवरून तन्वीर शेख याच्याशी ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत तन्वीर याने पीडितेच्या बदनामीची व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला संगमनेर व भंडारदरा येथे नेले. तेथे इतर संशयित आरोपींच्या मदतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिला अकोले येथे सोडून दिले. या घटनेनंतर पीडितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. एका आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती.
मात्र गुन्हा घडल्यानंतर दोघे संशयित आरोपी पसार झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, तुषार धाकराव, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, अशोक लिपणे, बाळासाहेब नागरगोजे, आकाश काळे, प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, ज्योती शिंदे आणि उमाकांत गावडे यांच्या दोन विशेष पथकांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता आरोपी गोव्यात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक गोव्याकडे रवाना झाले. मात्र त्याआधीच आरोपी पुण्यात पळून गेले. त्यानंतर पुण्यातील चंदननगर परिसरात शोधमोहीम राबवून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Post a Comment