पाक सैन्याच्या चेक पोस्टवर आत्मघाती हल्ला, ११ सैनिक ठार, भारतावर गंभीर आरोप



इस्लामाबाद: भारताविरोधातील दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या, हल्ल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या, दहशतवादी संघटना पोसणाऱ्या पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे. खैबर पख्तूनख्यामध्ये सोमवारी झालेल्या बॉम्ब स्फोटात लष्कराच्या ११ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. पख्तूनख्या प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील लष्कराच्या चेक पोस्टवर हल्ला झाला आहे. आत्मघाती हल्लेखोरानं स्फोटकांनी भरलेल्या कारनं चेक पोस्टला धडक दिली. यानंतर मोठा स्फोट झाला. त्यात ११ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.

पाकिस्तानी लष्करानं सोमवारी झालेल्या हल्ल्याची माहिती मंगळवारी दिली. १६ फेब्रुवारीला बाजौर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि कायदा लागू करणाऱ्या यंत्रणा यांच्या संयुक्त चेक पोस्टवर हल्ला झाला. हा हल्ला तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) घडवल्याचं पाकिस्तानी सैन्याकडून सांगण्यात आलं आहे. टीटीपीनं भारताच्या मदतीनं हल्ला घडवल्याचा आरोप पाकिस्तानी सैन्यानं केला आहे.

हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई करत १२ हल्लेखोरांना मारल्याचा दावा पाकिस्तानी सैन्यानं केला आहे. स्फोटानंतर चेक पोस्टच्या आसपासच्या भागात असलेल्या रहिवाशी इमारतींच्या काचा फुटल्या. या स्फोटात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.

चेक पोस्टवर 'इंडियन प्रॉक्सी टीटीपी'च्या हल्लेखोरांनी हल्ला करुन आत शिरण्याचा प्रयत्न केल्याचं पाकिस्तानी सैन्यानं सांगितलं. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तेव्हा हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेल्या कारनं भिंतीवर धडक दिली. यात ११ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह एका लहान मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी सैन्यानं दिली.

पाकिस्तानी सैन्यानं त्यांच्या अपयशाचं खापर भारतावर फोडलं आहे. भारत पुरस्कृत दहशतवाद्यांना संपवण्यासाठी कारवाया सुरु असल्याचं पाकिस्तानी लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. अज्म-ए-इस्तेहकामच्या अंतर्गत दहशतवादविरोधी मोहीम सुरु असल्याची माहिती सैन्यानं दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच मामुंड पोलीस ठाण्यावर असाच हल्ला झाला होता. त्यात स्टेशन हाऊस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षभरापासून अशा हल्ल्यांची संख्या वाढली आहे. २०२४ मध्ये खैबर पख्तनूख्वामध्ये अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये १,६२० जणांचा मृत्यू झाला होता. हाच आकडा २०२५ मध्ये वाढून २,३३१ झाला
.

0/Post a Comment/Comments