रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात भाग्यश्री साकारणार खास व्यक्तीरेखा



मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ प्रभावी व्यक्तिरेखा वठवल्यानंतर अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'राजा शिवाजी' या चित्रपटातून ती जिजामाता ही भूमिका साकारणार आहे. ऐतिहासिक, सशक्त आणि स्त्रीशक्तीचं सामर्थ्य दाखवणारी भूमिका असल्यानं लगेच त्यासाठी होकार दिल्याचं ती सांगते. आगामी चित्रपट, भूमिका निवडण्याचे निकष, तयारी आणि आजच्या काळातील सिनेमा अशा मुद्यांवर ती व्यक्त झाली.

पुन्हा इतिहास वाचला

चित्रपटातील भूमिका स्वीकारण्याबाबत भाग्यश्री म्हणाली, 'रितेश देशमुख यांनी कथा आणि व्यक्तिरेखेबद्दल सांगताच मी लगेचच होकार दिला. जिजामाता ही भूमिका एका अशा स्त्रीची आहे; जी स्वतः शक्तिशाली आहेच, पण इतरांनासुद्धा सशक्त करणारी आहे. आपल्या इतिहासात अशा स्त्रिया होऊन गेल्या आहेत. स्त्रीशक्ती म्हणजे फक्त तलवार उचलून लढणं असं नाही; कधी कधी एखाद्याच्या पाठीशी उभं राहून त्या व्यक्तीला घडवणं हेच खरं सामर्थ्य असतं. हल्ली 'महिला सक्षमीकरण' हा शब्द खूप वापरला जातो. पण स्त्री घरात राहूनही समाज घडवू शकते, पिढ्या घडवू शकते. ही भूमिका ती अतिशय प्रभावीपणे निभावते. त्यामुळेच ती भूमिका मला खूप जवळची वाटली. सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा इतिहास वाचला, समजून घेतला.'

काम निवडताना निकष महत्त्वाचे

'कोणतंही काम घेताना भाषा हा माझ्यासाठी कधीच मुद्दा नसतो. भूमिका सशक्त आहे का, कथानकातील व्यक्तिरेखेचं स्थान या गोष्टींचा मी विचार करते. काम छोटं असलं, तरी ते महत्त्वपूर्ण असलं पाहिजे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चित्रपट पूर्ण होईल का आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल का, याबाबतही मी माहिती घेते. बरेच चांगले चित्रपट बनतात, पण प्रदर्शितच होत नाहीत. कलाकार म्हणून आम्ही त्या-त्या कलाकृतीसाठी वेळ देतो, मेहनत देतो; पण ते पडद्यावर दिसणारच नसेल, तर त्याला काही अर्थ उरत नाही. निर्माता, दिग्दर्शकांकडे चित्रपट पूर्ण करून प्रदर्शित करण्याचं सामर्थ्य असणं खूप गरजेचं आहे', असं ती स्पष्टपणे सांगते.

नकारात्मक कथेला नकारच

आजच्या सिनेमांच्या कथा वैविध्यपूर्ण विषयांवर बेतलेल्या असतात. पण त्यातून प्रेक्षकांना काहीतरी मिळायला हवं, असं भाग्यश्री नमूद करते. 'आजच्या कथा प्रेक्षकांना काहीतरी देणाऱ्या असायला हव्यात. फक्त करमणूक नव्हे, तर शिकवण देणाऱ्या कथा हव्यात. जर एखाद्या कलाकृतीचा प्रेक्षकांवर, समाजावर नकारात्मक परिणाम होणार असेल, तर ती कथा मी नाकारते. कारण मनोरंजनसृष्टीचा कळत-नकळत जनमानसावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे सकारात्मक कलाकृतीला मी प्राधान्य देते. हलकंफुलके मनोरंजन वेगळ्या प्रकारात येतं, पण गंभीर, ऐतिहासिक किंवा वास्तवावर आधारित कथांमध्ये जबाबदारी असते', असं तिनं सांगितलं. कलाकार म्हणून कलाकृतीच्या परिणामाबद्दल सजग असल्याचं ती आवर्जून सांगते.

0/Post a Comment/Comments