वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी 'करो या मरो' ची परिस्थिती



मुंबई : भारतीय संघ व्यवस्थापन टी२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील 'सुपर-८' फेरीतील पुढील लढतीत सध्या फॉर्मात नसलेल्या तीन फलंदाजांपैकी किमान एकाला डच्चू देण्याची शक्यता आहे. तसे संकेत भारतीय क्रिकेट संघाचे सहायक प्रशिक्षक रायन टेन डोशेट आणि सितांशू कोटक यांनी दिले.

रविवारी झालेल्या पराभवानंतर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला पुढील दोन सामने जिंकणे अनिवार्य असून, संघ व्यवस्थापनाला अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या कामगिरीचा आढावा घ्यावा लागणार आहे. 'फिनिशर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिंकू सिंहची कामगिरीही निराशाजनक आहे. फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक म्हणाले, 'मुख्य प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाला काही तरी वेगळे करण्याची गरज वाटत असेल, तर आम्ही संघात बदल करू.' रिंकू सिंहबद्दल डोशेट म्हणाले, 'सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणे कठीण असते. रिंकूने नामिबियाविरुद्ध ज्या परिस्थितीत फलंदाजी केली, तिथे त्याला धावा घेता आल्या नाहीत. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तो कठीण परिस्थितीत आला आणि त्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. खेळपट्टी संथ असल्यामुळे त्याला यश आले नाही. आता केवळ प्रत्यक्ष मैदानावरील कामगिरीच महत्त्वाची आहे.' एकीकडे कर्णधार सूर्यकुमार यादव आम्हाला फलंदाजांच्या फॉर्मची चिंता नसल्याचे सांगत असला, तरी अभिषेक आणि तिलक यांच्याबद्दल बोलताना डोशेट यांनी त्यांचा फॉर्म चिंतेचा विषय असल्याचे मान्य केले.

सहायक प्रशिक्षक रायन टेन डोशेट म्हणाले, 'संघात तज्ज्ञ फलंदाजांचा पर्याय उपलब्ध नसणे ही चिंतेची बाब आहे. खराब फॉर्ममध्ये असूनही संजू सॅमसनला संघात परत आणले जाऊ शकते. अव्वल फळीत केवळ डावखुरे फलंदाज असल्यामुळे निर्माण झालेला एकसुरीपणा मोडण्यासाठी उजव्या हाताच्या फलंदाजाला संधी दिली जाऊ शकते. गेल्या १८ महिन्यांपासून चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना साथ द्यायची की संजूला संघात स्थान द्यायचे? संजू हा एक विलक्षण खेळाडू आहे आणि डावपेचांच्या दृष्टीने वरच्या फळीत उजव्या हाताचा फलंदाज असणे फायदेशीर ठरेल. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी सॅमसनच्या निवडीवर नक्कीच चर्चा होईल.'

0/Post a Comment/Comments