भाजपच्या बेपत्ता नेत्याचा मृतदेह कारमध्ये आढळला, राजकीय वर्तुळात खळबळ



तेलंगणा - तेलंगणामध्ये राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भाजप नेत्याचा मृतदेह एका कालव्यात पडलेल्या कारमध्ये आढळून आला. पोलिसांच्या मदतीने कालव्यातून कार बाहेर काढण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच हा अपघात होता की घातपात याचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत भाजप नेत्याचे नाव टी. रमणा असे आहे. सदर घटना तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातील पेगडपल्ली मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सुद्दापल्ली येथील मल्याळा पूर येथे घडली आहे. टी. रमणा हे या भागातील एक सक्रिय नेते होते आणि अलिकडेच त्यांनी बीआरएस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून ते बेपत्ता होते.

टी. रमणा हे बेपत्ता असल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस त्यांचा शोधातच होते. अशातच काल म्हणजेच रविवारी स्थानिकांना कालव्यात तरंगणारी कार दिसली. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या मदतीने गाडी बाहेर काढली. या कारमध्ये पोलिसांना टी. रमणा यांचा मृतदेह आढळला.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, टी. रमणा यांची कार कालव्यात पडून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र हा अपघात आहे की, घातपात याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच टी. रमणा यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान भाजप नेत्याच्या मृत्यूनंतर तेलंगणातील राजकारणात खळबळ उडाली आहे.


 

0/Post a Comment/Comments