नागपूर : ‘पूर्वी वीजेचे दर प्रत्येक वर्षी ९ टक्क्यांनी वाढायचे. मात्र, २०२५ ते २०३० या पाच वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी वीजेचे दर १.२ टक्क्यांनी कमी होणार आहेत. घरगुती वीजेसाठी आज जो दर आहे तो २०३० मध्ये २६ टक्क्यांनी तर औद्योगिक उपयोगासाठी लागणाऱ्या वीजेचा दर ९ टक्क्यांनी कमी झालेला असेल,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.
वारी एनर्जीजच्या अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील सोलर इनगॉट आणि वेफर उत्पादन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वारी एनर्जीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. हितेश दोशी, राज्यमंत्री अॅड. आशिष जैस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे, वारी एनर्जीजचे संचालक किरीट दोशी, संचालक पंकज दोशी, माजी खासदार अजय संचेती, वीरेन दोशी यांची उपस्थिती होती.
अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रातील प्रगतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. "आज भारत सर्वात वेगाने पारंपरिक ऊर्जेकडून अपारंपरिक ऊर्जेकडे वळणारा देश ठरत आहे. पूर्वी आपण चीनमधून सोलर मोड्युल, वेफर, इनगॉट आयात करायचो. आता तसे राहीलेले नाही. मुख्यमंत्री सौरवाहिनी प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांची १६ हजार मेगावॅट विजेची गरज पूर्ण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ५ हजार मेगावॅट क्षमता निर्माण झाली असून, वर्षाखेरपर्यंत हा आकडा १४ हजार मेगावॅटवर पोहोचेल", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
थर्मल पॉवरद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ३०० कोटी झाडे लावावी लागली असती. मात्र, सौरऊर्जेमुळे एकही झाड न लावता हे प्रदूषण रोखणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, सौर कृषीपंप योजनेअंतर्गत देशातील एकूण पंपांपैकी ६० टक्के पंप एकट्या महाराष्ट्रात बसवण्यात आले असून, एका महिन्यात सर्वाधिक पंप लावण्याचा जागतिक विक्रम (गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड) महाराष्ट्राने नोंदवला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
लोकं दावोसवर टीका करत असतात. मी त्या टीकेला कामाने उत्तर देत असतो. आज मी तीन प्रकल्पांचे भूमिपूजन केले आहे. त्यात न्यु ईरा क्लीनटेक, ग्रेटा एनर्जी आणि वारी एनर्जीज यांचा समावेश आहे. हे तीनही प्रकल्प दावोसच्या माध्यमातून साकारत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
'अठरा महिन्यात प्रकल्प कार्यान्वित करू'
"२००७ मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही त्यांच्या प्रोत्साहनाने सोलर क्षेत्रात उतरलो. आज सोलर क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून आम्ही उदयास आलो आहे. याच श्रुंखलेत नागपूर येथे उद्योग सुरू करण्याचा मानस होता. त्यानुसार, येथे हा प्रकल्प सुरू होत आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकारचे संपूर्ण सहकार्य लाभले. तीन दिवसांत जागा मिळाली. पंधरा दिवसांत बांधकाम सुरू करून अठरा महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित करू. यासाठी ३० हजार कोटींची गुंतवणूक आम्ही करणार आहोत. २ हजार लोकांना प्रत्यक्ष तर चार ते सहा हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत सोलर क्षेत्रातील संशोधन केंद्र, कौशल्य विकास केंद्र येथे होईल. पाचशे जणांना चीन येथे पाठवून त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल", अशी माहिती प्रास्ताविकपर भाषणात वारी एनर्जीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. हितेश दोशी यांनी दिली.
हे ही वाचा ...
सावधान! तुमच्या मोबाईलवर आलेला 'हा' व्हिडीओ खरा की खोटा?
'या' अभिनेत्रीचा ४ वर्षांचा संसार मोडला!, पतीकडे किती मागितली पोटगी?

Post a Comment